Mohali : जत्रेत 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा, अनेक जण जखमी, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Swing Fell in Mohali : पंजाबमधील मोहाली येथे जत्रेमध्ये 50 फूट उंचीवरून आकाश पाळणा खाली कोसळून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये अनेक लोक जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Mohali News : पंजाबमध्ये (Punjab) जत्रेत एक मोठा अपघात घडला आहे. मोहाली (Mohali) येथील एका जत्रेत 50 फूट उंचीवरून आकाश पाळणा खाली कोसळून मोठा अपघात झाला आहे. मोहाली शहरातील फेज आठ येथील दसरा ग्राऊंड येथे जत्रेतील आकाश पाळणा खाली कोसळला. या दुर्घटनेमध्ये 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी पाळण्यामध्ये 30 हून अधिक जण बसले होते. दरम्यान जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात उंच आकाश पाळणा वेगाने खाली जमिनीनर आदळला, त्यामुळे या अपघातात लोकांना मान आणि पाठीला दुखापत झाली आहे. अपघातानंतर पाळण्याचा ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
कुठे घडला अपघात?
पंजाब येथील मोहाली शहरात रविवारी ही दुर्देवी घटना घडली आहे. मोहालीमधील दसरा ग्राऊंड येथील जत्रेमध्ये हा अपघात घडला. दसरा ग्राऊंड येथे जत्रा भरली होती. रविवार असल्यानं जत्रेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी हा अपघात घडला. जत्रेतील ड्रॉप टॉवर आकाश पाळणा 50 फूट उंचीवरून अतिशय वेगानं खाली कोसळला. यावेळी आकाश पाळणा त्यामधील लोकांसह खाली कोसळला. यावेळी सुमारे 30 जण पाळण्यामध्ये बसलेले होते. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.
पाहा व्हिडीओ : थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
दुर्घटनेनंतर पाळण्याचा मालक आणि कर्मचारी फरार
या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना तेथून बाहेर काढण्यात आलं. जत्रेच्या ठिकाणी आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचाराची व्यवस्था नव्हती. अपघात झाला तेव्हा चेंगराचेंगरी झाली. यामध्येही अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जत्रेत नागरिकांची मोठी गर्दी होती. हा अपघात कसा झाला यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.