दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग भारत-चीनचे हे राष्ट्रप्रमुख गेल्या काही वर्षात सातत्यानं भेटत होते. दोन्ही देशांमधला तणाव कमी होतोय, डिप्लोमॅटिक दृष्ट्या जवळीक वाढतेय असा काहींचा समज त्यामुळे झाला होता. पण चीननं पुन्हा एकदा विश्वासघातच केला आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 पासून जी मैत्रीची साखरपेरणी करायचा प्रयत्न केला, त्यात चीननं मात्र मिठाचा खडा टाकला आहे.


पंतप्रधान मोदी पहिल्यांदा सत्तेत आले त्याच वर्षी 2014 मध्ये त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारतभेटीचं आमत्रण दिलं होतं. दोघे एकत्रित झोपाळ्यावर बसून गप्पा मारत असल्याची दृश्यं जगानं पाहिली. एवढंच नाही गेल्या सहा वर्षातही हा भेटीगाठीचा सिलसिला कायम राहिला. पण तरीही चीननं शेवटी जे करायचं ते केलंच.


पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जीनपिंग यांच्यात 2014 नंतर आत्तापर्यंत तब्बल 18 भेटी झाल्यात. कधी द्विपक्षीय चर्चा, तर कधी बहुराष्ट्रीय परिषदांमध्ये हे दोन नेते सतत भेटत राहिले. सहा वर्षात अठरा भेटी म्हणजे साधारणपणे वर्षातून तीनवेळा हे नेते एकमेकांना भेटत होते. पण या भेटीतून दोन्ही देश जवळ येणं अपेक्षित होतं, ते काही घडताना दिसलंच नाही.


2014 नंतर पंतप्रधान मोदी यांनी तब्बल पाच वेळा चीनचा दौरा केला. गेल्या सत्तर वर्षात इतक्या वेळा चीनला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. परराष्ट्र धोरणामध्ये चीनला गोंजारत राहणं महत्वाचं आहेच. त्यासाठीच त्यांनी हा खटाटोप केला. कधी बिझनेस परिषदा, कधी व्यापारी करार, कधी जागतिक मंच सगळ्या व्यासपीठांवर चीनशी सलोख्याचा प्रयत्न झाला. शांघाय दौऱ्यात तर पंतप्रधांनांनी चीनला केलेलं दोस्तीचं आवाहन सगळ्या जगासाठी महत्वाची घटना होती.


भारत आणि चीन जर एका भाषेत बोलू लागले तर सगळ्या जगाला त्याची दखल घ्यावी लागेल. एशियन सेंच्युरी, पर्सनल केमिस्ट्री असं मोदी-जीनपिंग भेटींचं वर्णन चिनी सरकारी माध्यमांमध्येही झळकू लागलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , जपानचे शिंजो आंबे, चीनचे जीनपिंग, पंतप्रधान मोदी हे परराष्ट्र धोरणात पर्सनल केमिस्ट्रीला खूप महत्त्व देत होते. त्यासाठी प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊनही त्यांनी काही गोष्टी करायला मागे पुढे पाहिलं नाही. पण याच चीननं आता भारताला दगा दिलाय..


पंतप्रधान मोदी हे गेल्या काही वर्षांपासून जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही न चुकता देत होते. अगदी 2017 मध्ये डोकलामचा वाद सुरु होता, तेव्हाही मोदींच्या शुभेच्छा चुकल्या नव्हत्या. 15 जूनला जिनपिंगचा वाढदिवस असतो. यावेळी मात्र मोदींनी जिनपिंग यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. कदाचित सीमेवर सगळं काही आलबेल नाही. चीन जास्तच अतिरेक करतोय याची जाणीव झाल्यानंच मोदींच्या शुभेच्छांमध्ये खंड पडला असावा. पण या घटनेचीही डिप्लोमसी वर्तुळात चर्चा झाली. मोदी-जीनपिंग यांच्या इतक्या भेटीनंतरही जे कमवायचं होतं ते कमावता आलं नाही.


संबंधित बातम्या :




India-China Dispute | भारताने सीमेजवळ पायाभूत सुविधा मजबूत केल्यामुळे चीनला पोटशूळ | डॉ सतीश ढगे