मुंबई : लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर (एलएसी) चीन सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत एका कमांडिंग अधिकाऱ्यासह भारताचे 20 जवान शहीद झाले. कर्नल संतोष बाबू असं या कमांडिग अधिकाऱ्याचं नाव आहे. या झटापटीत संतोष बाबू यांच्यासह भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं असलं तरी भारतानेही तेवढ्याच ताकदीने चीन सैन्यालाही प्रत्युत्तर दिलं. यामध्ये चीनच्या कमांडिंग अधिकाऱ्यासह सुमारे 40 जवान ठार झाल्याचं म्हटलं जात आहे.


दरम्यान कर्नल संतोष बाबू यांचं पार्थिव आज त्यांच्या तेलंगणामधील त्यांच्या मूळगावी पोहोचेल. इथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी चीन सैन्याशी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबू कोण होते हे जाणून घेऊया.


- चीनसोबतच्या संघर्षात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू शहीद झाले. कर्नल संतोष बाबू हे 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी होते.


- संतोष बाबू हे मूळचे तेलंगणा राज्यातील सूर्यापेट जिल्ह्यातील आहे.


- कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई आणि वडील असा परिवार आहे. पत्नी आणि मुलं दिल्लीत राहतात. त्यांचे वडील बी उपेंदर हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत.


- संतोष बाबू यांची लवकरच हैदराबादमध्ये पोस्टिंग होणार होती.


- संतोष बाबू 2004 मध्ये सैन्यात भरती झाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये झाली.


- भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाबाबत संतोष बाबू यांचं रविवारी (13 जून) त्यांच्या आईसोबत बोलणं झालं होतं.


- या हिंसक झटापटीत संतोष बाबू शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल (16) दुपारी त्यांच्या कुटुंबीयांना कळवली


- संतोष बाबा यांचं पार्थिव आज त्यांच्या सूर्यापेट या मूळगावी पोहोचण्याची शक्यता आहे. तर उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.


'संतोष बाबू 'खरा लढवय्या सैनिक' होता'
"संतोष बाबू खरंच एक लढवय्या सैनिक होता. ते फक्त आणि फक्त देशासाठी श्वास घेत होते, जगत होते आणि काम करत होते. ते कायमच आपल्या ज्युनिअर्सची काळजी घ्यायचे. प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहिल याची खबरदारी ते घ्यायचे" असं एका अधिकाऱ्याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.


उद्ध्वस्त झालेय पण मुलाचा अभिमान : आईच्या भावना
"तो आम्हाला सोडून गेल्यामुळे मला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय, कारण तो माझा एकुलता एक मुलगा होता. पण त्याचवेळी आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, याचा अभिमानही आहे," अशी प्रतिक्रिया कर्नल संतोष बाबू यांनी दिली.


वडील म्हणून दु:ख, पण भारतीय म्हणून मुलाचा अभिमान : बी उपेंदर
शहीद कर्नल संतोष बाबू यांचे वडील बी उपेंदर म्हणाले की, "तो केवळ 37 वर्षांचा होता आणि त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य होतं. वडील म्हणून मी अतिशय दु:खी आहे. पण एक भारतीय नागरिक आणि सैनिकाच्या कुटुंबाचा भाग म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान आहे."


भारत-चीन सीमेवर हिंसक झडप
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.


भारत-चीन वाद नेमका काय आहे?
लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.