Presidential Election : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांची निर्णायक आघाडी, विजय निश्चित
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांच्याविरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा त्यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने मागे आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मूल्य 3,78,000 इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती, त्यांच्या मताचे मूल्य हे 1,45,600 इतकं होतं. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 1349 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती
ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म.
सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश.
1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी.
2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री.
2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती.
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.