राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक: भाजपकडून 'या' महिला उमेदवारांना संधी?
President Election : आगामी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
President Election : पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यावतीने यंदा दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी महिलांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच उमेदवारांसोबत चर्चा केली असल्याची माहिती आहे.
देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी यंदा पहिल्यांदाच आदिवासी महिलेला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उईके आणि झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मागील महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापैकी काहीजणींसोबत प्रदीर्घ चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. ओडिशाच्या रहिवासी द्रौपदी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या नेत्या होत्या. तर, आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. आनंदीबेन पटेल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील समजल्या जातात.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून महिला कार्ड वापरले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनुसूचित जमातीला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवाराबाबतचा निर्णय घेताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, एनडीएकडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी महिलांनाच संधी मिळणार असल्यास ही ऐतिहासिक घटना ठरू शकते. आतापर्यंत दोन्ही पदे एकाच वेळी महिलांनी भूषवली नाहीत. प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपती होत्या. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी एनडीएकडून विरोधकांसोबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: