Prakash Singh Badal: 20 व्या वर्षी सरपंच ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री; असा होता प्रकाश सिंह बादल यांचा राजकीय प्रवास
Prakash Singh Badal: पंजाबच्या राजकारणातील पितामह अशी ओळख असलेल्या प्रकाश सिंह बादल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 20 व्या वर्षापासून झाली होती.
Prakash Singh Badal: मागील वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा पंजाबमधील लांबी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. शिरोमणी अकाली दलाचे संरक्षक प्रकाशसिंग बादल येथून उमेदवारी अर्ज दाखल करत होते म्हणून नव्हे, तर बादल यांचे वय 94 वर्ष होते आणि त्या वयातही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
पंजाबच्या राजकारणातील केंद्र
राजकारणाच्या इतिहासात जेव्हा पंजाबच्या राजकारणाची चर्चा होईल तेव्हा ती शिरोमणी अकाली दलाशिवाय ही चर्चा सुरू होणार नाही आणि त्याचे संरक्षक प्रकाशसिंग बादल यांचे नाव घेतल्याशिवाय संपणार नाही. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील लांबी विधानसभेतून ते 1997 पासून सलग 5 निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला. पंजाबच्या राजकारणावर त्यांची चांगलीच पकड होती.
प्रकाशसिंग बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील माळव्याजवळील अबुल खुराना गावात झाला. ते जाट शीख समाजातील होते. बादल यांच्या पत्नीचे सुरिंदर कौर यांचे 2011 मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.
20 व्या वर्षी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय
ब्रिटीशकालीन भारत, भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वतंत्र भारताची जडण-घडण पाहिलेल्या काही मोजक्या नेत्यांपैकी प्रकाश सिंह बादल होते. वयाच्या 20 व्या वर्षी 1947 मध्ये त्यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 1957 मध्ये त्यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर 1969 च्या निवडणुकीत विजयी झाले.
केंद्रीय राजकारणात हस्तक्षेप
यादरम्यान त्यांनी गुरनाम सिंग यांच्या सरकारमध्ये सामुदायिक विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची जबाबदारीही घेतली. बादल 1996 ते 2008 या काळात अकाली दलाचे अध्यक्षही होते. त्यांनी फक्त पंजाबमधूनच राजकारण केले, पण 1977 साली केंद्रातील मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये सुमारे अडीच महिने ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रीही होते.
पंजाबच्या राजकारणातील पितामह
प्रकाशसिंग बादल यांना पंजाबच्या राजकारणातील पितामह असे म्हणतात. बादल हे 5 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि 10 वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. बादल यांनी 1970 मध्ये पहिल्यांदा राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर 1977 मध्ये ते राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. वीस वर्षांनंतर त्यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतली. मात्र यावेळी भाजपशी त्यांनी केलेल्या युतीचा फायदा त्यांना झाला होता.
1996 मध्ये भाजपसोबत युती
1996 मध्ये भाजप आणि अकाली दल एकत्र आले आणि 1997 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच त्यांनी युती करून निवडणूक लढवली. याचा राजकीय फायदा दोन्ही पक्षांना झाला. या निवडणुकीमुळे भाजपला पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी जमीन मिळाली. तर, बादल यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. 1997 मध्ये, बादल यांनी राज्याचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि 2007 मध्ये चौथ्यांदा आणि 2012 मध्ये पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.
1992 मधील निवडणुकीवर शिरोमणी अकाली दलाने बहिष्कार घातल्याने बादल यांनी निवडणूक लढवली नाही. तर, मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बादल यांना आपच्या उमदेवाराकडून पराभव स्वीकारावा लागला होता.