नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोनाचा रिपोर्ट अनिवार्य नसणार आहे. कोरोना रिपोर्टसाठी कोणत्याही रुग्णाची अडवणूक करता येणार नाही, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. बऱ्याचदा कोरोनाची लक्षणं दिसून येतात, पण कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होता येत नाही. तसेच अनेकदा आरटीपीसीआर रिपोर्ट नेगेटिव्ह येतो, परंतु, सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येतो, अशा रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर अॅडमिशन ऑफ कोविड पेशंट यात बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश जारी :
- कोणत्याही कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे. एक संशयित रुग्ण म्हणून CCC, DCHC किंवा DHC अशा संशयित वॉर्डमध्ये दाखल केलं जाऊ शकतं.
- रुग्णांना त्रास होत असल्यास त्याला दाखल करुन उपचार देण्यासाठी नाही म्हणता येणार नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे, जरी रुग्ण दुसऱ्या शहरातील असेल तरी त्याला उपचार देणं टाळता येणार नाही.
- कोणत्याही रुग्णाकडे ओळख पत्र नाही म्हणून त्याला उपचार देणं टाळता येणार नाही.
- रुग्णालयात प्रवेश आवश्यकतेनुसार मिळणं गरजेचं आहे. ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांनाच बेड उपलब्ध करुन देण्यात यावा.
- https://www.mohfw.gov.in/pdf/ReviseddischargePolicyforCOVID19.pdf मध्ये सांगण्यात आल्यानुसार, रुग्णांना डिस्चार्च दिला जावा.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक; Bharat Biotech च्या सह-सस्थापिका सुचित्रा इला यांचं मत
- मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीका, आक्षेपार्ह प्रतिक्रिया हटवण्यास प्राधान्य; लँसेटमधून ताशेरे
- 'नेमकं बरोबर कोण! पंतप्रधान की आपण?' राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर