मुंबई :  मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फडणवीस यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


Coronavirus : कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा, जनतेची दिशाभूल नको; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र





फडणवीसांवर जयंत पाटील आणि सचिन सावंतांचा हल्लाबोल


फडणवीसांनी या पत्राचं ट्वीट केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, मला आशा आहे की आपणास हे माहित असेलच की आजच पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना रोखण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आता प्रश्न हा आहे की, कोण बरोबर आहे - पंतप्रधान की आपण? असा सवाल केला आहे.



काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली. याचा फडणवीसजींना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती. असो! खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीसजी इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचे आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.






काय म्हणाले फडणवीस


मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के तर मुंबईत 12 टक्के इतके होते. मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात मुंबईत 1593 इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 12 टक्के आहे. दुसर्‍या लाटेत तर 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या काळात 1773 पैकी 683 मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे.  आता आपण म्हणतोय की, आपण तिसर्‍या लाटेसाठी सज्ज होतोय्, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय, ते पूर्णत: दिशाभूल करणारे आणि कोरोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.