नवी दिल्ली : मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपादकिय लेखातून भारताचे पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून कोरोना हटवण्यास नव्हे, तर ट्विटरवर त्यांच्याविरोधात आलेल्या टीका आणि आक्षेपार्ह कमेंट्स हटवण्याला प्राधान्य असल्याचं म्हणत ताशेरे ओढण्यात आले आहेत. या संपादकियाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसनंही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


संकटसमयी पंतप्रधान मोदी हे टीकेला आणि खुल्या चर्चेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून ही अक्षम्य बाब असल्याचा गंभीर मुद्दा या लेखातून मांडण्यात आला आहे. इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्यूएशनकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजाचा उल्लेखही या संपादकिय लेखात केला आहे. जिथं स्पष्ट सांगण्यात आलं होतं, की  1 ऑगस्टपर्यंत भारतात10 लाखांहून अधिक मृत्यू होतील. 


जेलमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत SC चिंतेत; गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना सोडण्याचे राज्यांना निर्देश


इशारा देऊनही सरकार गाफील 


'सुपरस्प्रेडर इवेंट्स'बाबत माहिती देऊनही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, मोठ्या संख्येनं राजकीय मोर्चे निघाले, यामध्ये असंख्य लोक सहभागी झाले होते. तेव्हा आता गंभीर परिस्थिती दिसून आल्यास या आत्मघातकी राष्ट्रीय नुकसानासाठी सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असेल असे खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 


भारतात अतिशय कमी वेगानं सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेवरही इथं प्रकाशझोत टाकत नकारात्मक सूर आळवण्यात आला आहे. सोबतच लसीकरण मोहमेत सुसूत्रता, लसींच्या पुरवठ्यावर भर देण्यासोबतच सरकारकडून यासंबंधीच्या स्पष्ट आकडेवारीला जाहीर करण्याचंही प्राधान्य देण्यात यावं असा सल्ला संपादकियातून देण्यात आला आहे. 


काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड 


भारत नैसर्गिक नव्हे, तर मोदी सरकारनिर्मित राष्ट्रीय आपत्तीकडे वळत असल्याचा उल्लेख लँसेटकडून करण्यात आल्याची बाब अधोरेखित करत काँग्रेस महासचिव अजय माकन यांनी पुढच्या 80 दिवसांमध्ये जवळपास 7 लाख मृत्यू होणार असल्याच्या माहितीकडे लक्ष वेधलं. इंडियन मेडिकल एसोसिएशननं पत्र लिहून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. सोबतच दोन आठवड्यांचा राष्ट्रीय लॉकडाऊन आणि सरसकट सर्वांसाठी लसीकरणाचीही मागणी केली असल्याचा मुद्दा उचलून धरला. लँसेट आणि आयएमएनं सांगितलेल्या माहितीप्रमाणंच राहुल गांधी आणि काँग्रेसनंही काही गोष्टींवर प्रकाश टाकला होता, पण सत्ताधाऱ्यांना इथे लक्षच द्यायचं नाहीये असा तीव्र नाराजीचा सूर आळवत माकन यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.