नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) वाहतूक करणार्‍या टँकर व कंटेनर्सना विनाव्यत्यय मार्ग देण्यासाठी टोल नाक्यांवर अशा वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना साथीमुळे देशभरात सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची अभूतपूर्व मागणी लक्षात घेता, द्रव वैद्यकीय ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अन्य आपत्कालीन वाहनांप्रमाणेच रुग्णवाहिकांप्रमाणे वागवले जाईल आणि हा निर्णय दोन महिन्यांच्या कालावधीपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील. 


एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, फास्टॅग (FASTag) लागू झाल्यानंतर टोल नाक्यांवर जास्त वेळ लागत नाही. परंतु आता वैद्यकीय ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांच्या जलद आणि अखंड वाहतुकीसाठी अशा वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात एनएचएआयने आपल्या सर्व अधिकारी व भागधारकांना शासकीय व खाजगी प्रयत्नांमध्ये मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


देशभरातील द्रव वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी, कोरोनाचे वाढते प्रमाण आदींसह कोरोनाबाधित गंभीर रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी द्रव वैद्यकीय ऑक्सिजन वेळेत रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर टोल माफीमुळे वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक वेगवान होईल, असा एनएचएआयला विश्वास आहे.


इतर बातम्या