Hathras | राहुल गांधी यांना हाथरस येथे झालेल्या धक्काबुक्कीनंतर राज्यात तीव्र पडसाद
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
हाथरस (उत्तर प्रदेश) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याअगोदर हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहेत प्रतिक्रिया?
गृहमंत्री अनिल देशमुख
- सरकार एक पक्षाच्या नेत्याला पीडित कुटुंबाचे सांत्वन करायला जाऊ देत नाही ही गंभीर गोष्ट आहे. युपी मध्ये जंगलराज.
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत
- राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली असं कधी महाराष्ट्रात घडणार नाही. एखादी नटी सोबत मीडिया घेऊन जाते व एक गरीब मुलीचं कुटुंब आक्रोश करतो तेव्हा ते जगाला कळू नये यासाठी दडपशाही केली जाते. त्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातून कोणी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल तर इथून आम्ही यावर टिप्पणी करणं योग्य नाही. पण योगींचा राजीनामा मायावतींनी मागून उपयोग नाही, त्यांचा राजीनामा रामदास आठवले यांनी मागितला पाहिजे तर त्याला अर्थ आहे.
खासदार सुप्रिया सुळे
- ही घटना अतिशय निंदाजनक असून मी त्याचा जाहीर निषेध करते. कोणतंही प्रशासन असो बलात्कार ही लाजिरवाणी गोष्ट आहे. फास्ट ट्रकमध्ये खटला झाला पाहिजे. राहुल गांधी हे खासदार आहेत ते कुठेही जाऊ शकतात. योगी सरकारचा जाहीर निषेध करते. ही कृती सरकारने केली हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधीची कॉलर धरणे योग्य आहे का?
रमेश बागवे, काँग्रेस
- उत्तर प्रदेश येथील हाथसर येथे दलित पीडितेच्या कुंटुबीयांना भेटायला जात असताना खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मारहाण केली. याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज सायंकाळी साडेचार वाजता बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
मंत्री अशोक चव्हाण
- अत्याचार पीडित तरूणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधा यांना रोखणे, राहुलजींना धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दंडेलशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
अत्याचार पीडित तरूणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघालेले @INCIndia चे नेते खासदार @RahulGandhi व @priyankagandhi यांना रोखणे, राहुलजींना धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दंडेलशाहीचा मी तीव्र निषेध करतो.#JusticeForIndiasDaughters pic.twitter.com/8ZVrYgCy8S
— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 1, 2020
काय आहे प्रकरण? हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र, त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.
UP Hathras gangrape case | राहुल, प्रियंका गांधींचा ताफा यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी रोखला