PM Narendra Modi : उत्तरप्रदेशनंतर भाजपचं मिशन गुजरात, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून गुजरात दौऱ्यावर
PM Narendra Modi : पुढील काही दिवसांत गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. भाजपकडून या निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
PM Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवले. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशनंतर आता भाजपनं सर्व लक्ष गुजरातकडे दिले आहे. पुढील काही दिवसांत गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. भाजपकडून या निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 तारखेपर्यंत गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान बनासकाठामध्ये तीन लाख महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 18 एप्रिलला सायंकाळी साडपाच वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देतील. 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बनासकाठामधील गांधीनगर हेलिपॅड ते बनासदेरी या वेगळ्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करतील. तसेच तिथे ते महिला, शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.
पंतप्रधानांची विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट -
पंतप्रधान 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. हे केंद्र दर वर्षी 500 कोटीहून अधिक माहिती संच संकलित करते आणि विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षण परिणामांच्या सुधारणेसाठी त्याचे बिग डाटा अॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिक शिक्षणपद्धतीचा वापर करून त्यांचे विचारपूर्वक विश्लेषण करते. हे केंद्र शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीवर लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे केंद्रीभूत समग्र आणि कालबद्ध मूल्यमापन करणे इत्यादी बाबतीत मदत करते. विद्यालयांसाठीचे कमांड आणि कंट्रोल केंद्राला जागतिक बँकेने वैश्विक स्तरावरील उत्तम पद्धतीचा दर्जा दिला आहे आणि त्यामुळे इतर देशांनी या केंद्राला भेट देऊन तेथील प्रक्रिया शिकून घेण्याला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.
बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलाला भेट -
19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 वाजता बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथे 600 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या डेरी संकुलाचे आणि बटाटा प्रक्रिया संयंत्राचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हे नवे डेरी संकुल ग्रीनफिल्ड प्रकारचा म्हणजे संपूर्णतः नव्याने उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पात दर दिवशी 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करता येईल, 80 टन लोणी निर्मिती होईल, एक लाख लिटर आईस्क्रीम तयार करता येईल, 20 टन खवा तयार करता येईल आणि 6 टन चॉकलेट तयार होईल. बटाटा प्रक्रिया संयंत्राच्या मदतीने फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, आलू टिक्की, पॅटीस यांसारखी बटाट्याची विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करता येतील आणि त्यांच्यापैकी अनेक उत्पादनांची इतर देशात निर्यात देखील केली जाईल. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि त्यातून या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल.
डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन -
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान जामनगरमध्ये 19 एप्रिल रोजी 3:30 वाजता डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन (जीसीटीएम ) ची पायाभरणी करतील. जीसीटीएम हे जगभरातील पारंपारिक औषधांसाठी पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असेल. हे जागतिक निरामय आरोग्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला येईल.
जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद -
पंतप्रधानांच्या हस्ते 20 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक देखील उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद होणार असून सुमारे 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रदर्शक उपस्थित राहणार आहेत. गुंतवणूक क्षमतांचा शोध घेण्यात ही परिषद मदत करेल आणि नवोन्मेष , संशोधन आणि विकास, स्टार्ट-अप परिसंस्था आणि आरोग्य विषयक उद्योगाला चालना देईल. उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास परिषद मदत करेल आणि भविष्यातील सहकार्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
दाहोद येथील आदिजाती महासंमेलनात पंतप्रधान -
पंतप्रधान 20 एप्रिल रोजी दाहोद येथे दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या आदिजाती महासंमेलनाला उपस्थित राहतील. यावेळी ते सुमारे 22,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. संमेलनात 2 लाखांहून अधिक लोकांचा सहभाग अपेक्षित आहे.