PM Modi : 20 स्लीपर सेल, 20 किलो RDX, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल मुंबईच्या NIA कार्यालयामध्ये आला होता.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आले आहे. मुंबईतील NIA कार्यालयामध्ये धमकीचा मेल आल्याचे गुप्तचर विभागातील सुत्रांनी माहिती दिली. धमकीच्या मेलचा अधिक तपास करण्यात येत आहे. या मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे. deccanherald ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचेही मेलमध्ये म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे, धमकी देणाऱ्याने दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही केलाय. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि ते कुठून पाठवले आहे, याचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. तसेच एनआयएने या मेलची माहिती इतर सुरक्षा यंत्रणांनाही पाठवली आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपासही सुरू केलाय. याआधीही अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला होता.
याआधीही मिळाली होती धमकी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी याआधीही मिळाली होती. सप्टेंबर 2021 मध्ये धमकी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरुन मिळाली होती. दीपक शर्मा नावाच्या ट्विटर खात्यावरुन धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी ट्विटरला या व्यक्तीची माहिती मागवली होती. याशिवाय जून 2021 मध्ये 22 वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या तरुणाचे नाव सलमान असे होते.