जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आता नष्ट होईल : नरेंद्र मोदी
जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. जम्मू-काश्मीरमधील जनतेनं घाबरू नये, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. तसेच जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामन्य झाल्यानंतर पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्वासनही नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं.
मोदींनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेचं अभिनंदन केलं. मोदी यावेळी म्हणाले की, कलम 370 रद्द झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. आता देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार आणि संधी मिळतील.
कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही संपुष्टात येण्यास मदत होईल. जम्मू काश्मीरमधील नागरिकांचं वर्तमान सुधारेल आणि भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यातून बाहेर निघणे आता शक्य होणार आहे, असं मोदींनी म्हटलं.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील रिक्त सरकारी पदे भरण्यात येतील. सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी योजनांपासून लांब राहावे लागले होते. मात्र आम्ही कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देऊ, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं.
जम्मू काश्मीरमधील तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. येथील तरुणांना सैन्यात भरतीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल. तसेच जम्मू काश्मीरमध्ये उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील : नरेंद्र मोदी
- लडाख केंद्रशासित प्रदेशच राहणार : नरेंद्र मोदी
- जम्मू काश्मीरमधील जनता कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना उत्तर देईल : नरेंद्र मोदी
- कलम 370 मुळे फुटीरतावाद, दहशतवाद, परिवारवाद पसरला आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला : नरेंद्र मोदी
- घराणेशाहीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांचं नेतृत्व उभं राहू शकलं नाही : नरेंद्र मोदी
- दहशतवाद आणि फुटीरतावादाचा नायनाट करणे आता शक्य आहे : नरेंद्र मोदी
- जम्मू काश्मीरमधील तरुणांना रोजगार उपलब्ध होतील, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील रिक्त पदे भरली जाणार : नरेंद्र मोदी
- जम्मू काश्मीरमधील तरुणांना सैन्यात भरतीसाठी प्रोत्साहन देणार : नरेंद्र मोदी
- जम्मू काश्मीरमध्ये उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणार : नरेंद्र मोदी
- जम्मू काश्मीरमधील नागरिक विकासापासून दूर होती : नरेंद्र मोदी
- कलम 370 मुळे काश्मीरमधील नागरिकांचं नुकसान झालं : नरेंद्र मोदी
- कलम 370 रद्द केल्याने देशातील नागरिकांचं स्वप्न पूर्ण झालं : नरेंद्र मोदी
- बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि करोडो देशवासियांचं स्वप्न पूर्ण झालं : नरेंद्र मोदी
- काश्मीरमधील जनतेचं वर्तमान आणि भविष्य सुधारेल : नरेंद्र मोदी