देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात हा एक प्रकारचा विक्रम : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भावूक झाल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भावूक झाल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना ते पायऱ्यांच्या पाया पडले होते. कालचा प्रकारावर इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती. अशाप्रकारे अश्रूंचा बांध फुटणे हे काही नवीन नव्हते. देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण आतापर्यंत 5 ते 7 वेळा ते भावनिक झाले आहेत. दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांचे अश्रू बाहेर पडले नाहीत, असं राऊत यांनी म्हटलंय.
राऊत म्हणाले की, पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्यानंतर यापूर्वी अनेकदा भाजपच्या नेत्यांनी आंदोलनं केली. आता आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला आंदोलनजिवी म्हटलं जातं. आमच्यावर टीका केली जाते. भाजप दिल्लीत पोहोचला तो आंदोलनाच्या माध्यमातूनच. आज विरोधी पक्ष आंदोलन करत असताना टीका करतात, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र कुठलाही भूकंप होणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे स्थिर आहे. सरकारला कुठलाही धोका नाही. भूकंप आता कोकणात झाला. अमित शाहा गेल्यानंतर 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत, असं त्यांनी सांगितलं.
आरक्षणविषयी बोलताना ते म्हणाले, काही गोष्टी मुद्दामहून न्यायालयीन प्रक्रियेत अडकवल्या आहेत, राज्य सरकार त्यात लक्ष घालत आहे, प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट्स हे लोकांना जनतेविरोधी वाटत असतील आणि राज्य सरकार त्यांची चौकशी करणार असेल तरी यामध्ये चूक काय आहे ? यावर आता भाजपच्या लोकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आंदोलन करणे इतकं मोठी चूक काय झाली. भाजपच्या या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागणार आहे. कारण एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात आंदोलन करू नका आणि महाराष्ट्रातील भाजपचे लोक आंदोलन करण्याची भाषा करतात. त्यामुळे भाजपच्या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागेल, असं राऊत म्हणाले.