PM Chairs Meet : उकाडा वाढला! वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली बैठक, उन्हाळ्याच्या तयारीचा आढावा
Central Meet for Summer Preparation : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून तयारीचा आढावा घेतला.
PM Meet to Review Preparedness for Summer : होळी आधीच उकाड्यामध्ये वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीचा तापमानात (Temperature) प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं. आता काही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत पंतप्रधानांनी उन्हाळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. फेब्रुवारीपूर्वीचं तापमानात प्रचंड वाढ झाली होती. उन्हाळ्यामध्ये अनेक आजांरामध्ये वाढ होते.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आगामी उन्हाळ्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांना उन्हाळा, मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी, आपत्ती व्यवस्थापन, रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा उपाय आणि जंगलातील वणवे यांसारख्या परिस्थितींना तोंड देण्यासाठीची तयारी याबद्दल माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी सर्व रुग्णालयांच्या तपशीलवार फायर ऑडिटच्या आवश्यकतेवर भर दिला. उष्णतेशी संबंधित आपत्ती आणि शमन उपायांसाठी तयारी करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.
रुग्णालयांचं ऑडिट करण्यावर पंतप्रधानांचा भर
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, उष्ण हवामानासाठी प्रोटोकॉल तसेच काय करावे आणि काय करू नये हे सोप्या भाषेत तयार केलं पाहिजे. याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिंगल्स, फिल्म्स, पॅम्प्लेट्स इत्यादींचा वापर करता येईल. सर्व रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक उपायांचे तपशीलवार ऑडिट करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. अग्निशमन विभागाकडून सर्व रुग्णालयांमध्ये मॉक फायर ड्रिल घेण्यात याव्यात, अशाही सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
यंदाचा उन्हाळा घामटा काढणार
राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचलाय. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरलाय. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.