त्रिपुरामध्ये इंधन संकट, पेट्रोल तब्बल 300 रुपये प्रति लीटर
आगरताळा : पूर्वोत्तर राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरामध्ये इंधन संकट ओढावलं आहे. त्रिपुरा-आसाम राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 8 पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल-डिझेल यांची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
त्रिपुरामध्ये पेट्रोल सध्या 300 रुपये प्रति लीटर दराने विकलं जात असून भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण आसामच्या करीमगंज जिल्ह्यातून त्रिपुराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 8 वर मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून हा मार्ग प्रभावित झाला असला तरीही गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे त्रिपुरामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचं सांगत विरोधी पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्रिपुराचे परिवहन मंत्री माणिक डे, सार्वजनिक बांधकाम मंत्री बादल चौधरी आणि अन्नपुरवठा मंत्री भानुलाल साहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली. यावेळी बांगलादेशातून काही मदत मिळवता येते का याचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.