नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून ती 110 डॉलर प्रति बॅरेलवर गेली आहे. परिणामी देशातील तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किमान 12 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचा दावा आयसीआयसीआय सिक्योरिटीजने (ICICI Securities) त्यांच्या एका अहवालात केला आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली तर त्याचा परिणाम देशातील महागाई आणि इतर गोष्टींवर होतो. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला असला तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र स्थिर आहेत. त्यामागे पाच राज्यांतील निवडणुका हे कारण असल्याचं सांगण्यात येतंय. 


कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने देशातील तेल कंपन्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. आता हे नुकसान भरुन काढण्यासाठी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता आहे. ही वाढ किमान 12 रुपये इतकी असेल असंही सांगण्यात येतंय. 


देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत, त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. 


निवडणुकीचा परिणाम
देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 7 मार्च रोजी होणार असून पाच राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 10 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आता निकालानंतर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: