Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आज नवव्या दिवशीही अजूनही सुरू आहे. अजूनही काही भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्ह आणि सर्वात मोठे शहर खार्किव येथे अडकले आहेत. 27 फेब्रुवारीला कीव्हमधून निघालेल्या हरजोत सिंह नावाच्या भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली, यामध्ये तो जखमी झाला आहे. सध्या हरजोत कीव्ह येथील रुग्णालयात दाखल आहेत. आता एबीपी न्यूजच्या माध्यमातून हरजोत सिंग यांने भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.


एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना हरजोत सिंग म्हणाला की, 'माझी एकच विनंती आहे की मला लवकरात लवकर येथून परत भारतात नेण्यात यावे जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला भेटू शकेन. मी भारतीय दूतावासातील जवळपास प्रत्येक व्यक्तीशी बोललो आहे. त्यांनी फक्त दिलासा दिला आहे. अजून कोणतीच मदत इथपर्यंत पोहोचलेली नाही.'


हरजोत सिंगने पुढे सांगितले की, 'माझे येथे कोणीही नाही. मला एके 47 ची गोळी लागली आहे. माझ्या पायात फ्रॅक्चर आहे. मी दूतावासाला विनंती केली आहे की मला कारने किंवा अन्य काही मार्गाने येथून घेऊन जा. मला चालता येत नाही. पायाला फ्रॅक्चर नसते तर मी स्वतः चालत सीमेवर गेलो असतो. कीव्हमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती कुठेही चांगली नाही.'


हरजोत सिंह 27 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जात होता. यादरम्यान त्याच्यावर कीव्हमध्ये गोळीबार करण्यात आला. स्थानिकांनी त्याला रुग्णवाहिकेच्या मदतीने कीव्ह शहरातील रुग्णालयात नेले. हरजोत सिंग भारतीय दूतावासापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. भारत सरकार आणि भारतीय दूतावास यांच्याकडे ते सतत मदतीची याचना करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha