Crude Price At 110 Dollar Per Barrel: रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने सात वर्षातील उच्चांक मोडला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलर इतके झाले आहेत. येत्या काही दिवसात कच्चे तेल आणखी महागणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महागाईच्या संकटाची चाहूल लागली आहे. 


कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक आहे रशिया


रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.  क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपला मागणीच्या एकूण 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो. भारतदेखील रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. कच्च्या तेलाचा पुरवठा खंडीत झाल्यास आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. 


इंधन किती महाग होणार?


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधन कंपन्यांचा खर्च वाढला आहे. साधारणपणे कच्च्या तेलाच्या दरात एक डॉलरची दरवाढ झाल्यास इंधन कंपन्यांकडून प्रतिलिटर 40 पैसे इतकी दरवाढ केली जाते. एक डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 68 डॉलर इतका होता. त्यानंतर आता 110 डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला आहे. जवळपास तीन महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात किमान 16 रुपयांची वाढ करावी लागू शकते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे इंधन कंपन्यांनी दरवाढ टाळली असल्याची चर्चा आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे 7 मार्चनंतर इंधर दरवाढीचा भडका उडण्याची भीती आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha