Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दररोज चकमक होत आहे. यासोबतच सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्लेही सातत्याने वाढत आहेत. याचदरम्यान काश्मीरमधील एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेने सीआरपीएफ चेक पोस्टवर पेट्रोल बॉम्ब फेकला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सुरक्षा दलांनी महिलेला अटक केली आहे.


 काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी या अटकेची माहिती दिली आहे. या महिलेचा संबंध लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले आहे. बुरखा घातलेल्या या महिलेने मंगळवारी सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांवर अचानक पेट्रोल बॉम्ब फेकला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संबंधीत महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. बॉम्ब फेकत असताना ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेची ओळख पटवून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दरम्यान, पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.






अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेने आधी पेट्रोल भरलेल्या बॅगला आग लावली आणि नंतर ती सुरक्षा दलाच्या बंकरवर फेकली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मंगळवारी सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी ही घटना घडली आहे.  


दरम्यान, मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील रैनावरी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून  यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती  पोलिसांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या