Mahua Moitra : 'महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांचे प्रकरण गंभीर' संसदीय समितीने चौकशीसाठी मोईत्रांना बजावले समन्स
Mahua Moitra Case : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे प्रकरण गंभीर असल्याचे संसदेच्या आचार समितीने म्हटले.
नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे प्रकरण गंभीर असल्याचे संसदेच्या आचार समितीने म्हटले. खासदार मोईत्रा यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून 31 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. पैशांच्या बदल्या प्रश्न विचारण्याच्या आरोपाबाबत संसदेच्या आचार समितीची बुधवारी पहिली बैठक पार पडली.
आचार समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनोद सोनकर यांनी सांगितले की, आज निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहादराय या दोघांना समन्स पाठवण्यात आले होते, दोघांनीही हजर राहून आपले म्हणणे मांडले. यानंतर 31 ऑक्टोबरला महुआ मोईत्राला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सोनकर यांनी सांगितले. त्यामध्ये त्या आपली बाजू मांडतील. तपशिल देण्यासाठी आयटी मंत्रालय आणि गृह मंत्रालयाला पत्र पाठवले जाईल, असेही समितीने ठरवले आहे.
निशिकांत दुबे यांच्यावर प्रश्न
वैयक्तिक भांडणामुळे निशिकांत दुबे यांनी महुआवर आरोप केल्याचेही समितीत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीमध्ये समाविष्ट असलेल्या एका विरोधी सदस्याने सांगितले की, महुआने निशिकांत दुबे यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे सांगितले.
त्यावर निशिकांत म्हणाले की, या मुद्द्यावर कोर्टाकडून क्लीन चिटही मिळाली आहे. निशिकांत दुबे यांनी समितीला जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा समितीसमोर हजर राहण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले.
बैठकीनंतर निशिकांत दुबे म्हणाले, "प्रश्न सामान्य होते... मी एवढेच सांगू शकतो की, सर्व खासदार चिंतेत आहेत. पुढील वेळी मला बोलावले तरी मी हजर राहिल. मात्र, प्रश्न हा आहे की, संसदेची प्रतिष्ठा कायम राखली जाईल का?
महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप काय?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, मोइत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देहद्राईने अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.
महुआ मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अलीकडच्या काही दिवसांपर्यंत महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समूहावर केंद्रित होते.
दरम्यान, उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला पैसे दिल्याचा आरोप आहे.