आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे पाकिस्तान झुकला, कुलभूषण जाधव यांना मिळाला 'हा' अधिकार
Kulbhushan Jadhav : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात कैद आहेत
Kulbhushan Jadhav case: पाकच्या कैदेत असणाऱ्या कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबापापुढे अखेरीस पाकिस्ताननं नमतं घेतलं आहे. कुलभूषण यांना पाकिस्तानातील न्यायालयात अपील करण्याचा अधिकार देणारं विधेयक पाक संसदेत पारित करण्यात आलंय. यामुळे कुलभूषण जाधव आता उच्च न्यायालयात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करू शकणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टीसनं (ICJ) ने विस्तृत विश्लेषण आणि पुर्नविचार करण्याचे आदेश दिले आहे. 2017 पासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकनं त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावलेला आहे. हेरगिरीच्या आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकच्या लष्करी न्यायालयानं त्यांना मृत्यूदंड सुनावला आहे.
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात कैद आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्याने 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्तानमधून अटक केली होती, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र भारताने वारंवार हा दावा फेटाळला आहे. कुलभूषण जाधव निवृत्ती घेऊन बिझनेच्या निमित्ताने इराणला गेले होते. तिथे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं, असं भारताचं म्हणणं आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सलर न दिल्याचा आरोप भारताने केला हाता. भारताने पाकिस्तानी सैन्याच्या जाधव यांच्याविरोधातील खटल्याला आव्हानही दिलं होतं. ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
'रॉ'चे हेर असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबिय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलीस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्विकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबियाने फेटाळून लावला आहे. 'माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,' असं त्यांचे वडील म्हणाले होते.