पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदल सतर्क, हालचालींना वेग, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांची चाचणी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे.
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हालचालींना वेग आला आहे. भारतीय नौदलाची जहाजे दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करत आहेत. भारतीय नौदलानेही अलीकडेच जहाजविरोधी क्षेपणास्त्र गोळीबाराची यशस्वी चाचणी घेतली आहे, जी त्यांच्या वाढत्या ताकदीचं उदाहरण आहे.
भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत ट्वीटरवर या सरावांचे व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले आहेत. नौदलाच्या जहाजांवरुन कशी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यापूर्वी देखील, भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौकांची छायाचित्रे शेअर केली होती आणि म्हटले होते की भारतीय नौदल कोणत्याही वेळी, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. या शक्तिशाली संदेशाकडे भारताच्या विरोधकांना स्पष्ट इशारा म्हणून पाहिले जात आहे. भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक स्ट्राइकसाठी प्लॅटफॉर्म, सिस्टीम आणि क्रूची तयारी पुन्हा प्रमाणित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी यशस्वी एकाधिक अँटी-शिप फायरिंग केले आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं भारतीय नौदलावर मोठी जबाबदारी आहे.
पाकिस्तानी नौदल हाय अलर्टवर
दुसरीकडे, भारतीय नौदलाच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही अरबी समुद्रात आपल्या नौदलाला हाय अलर्टवर ठेवले आहे. पाकिस्तानने अरबी समुद्राच्या काही भागांवर नो-फ्लाय झोन घोषित केला आहे. खलाशांना या प्रदेशापासून दूर राहण्याचा इशारा देत थेट फायर अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पाकिस्तान नवीन क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढू शकतो.
भारतीय युद्धनौका INS सुरतची शक्ती चाचणी
भारतीय युद्धनौका INS सूरतने अलीकडेच अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी केली. या चाचणीमध्ये, उच्च-वेगाने कमी उंचीचे लक्ष्य अचूकतेने नष्ट केले गेले. या चाचणीची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण पाकिस्तानने संभाव्य क्षेपणास्त्र चाचणीचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच भारतीय नौदलाने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. भारतीय नौदलाच्या सामरिक सज्जतेचा आणि उच्च लढाऊ क्षमतेचा हा स्पष्ट पुरावा आहे.
दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
























