Padma Awards: 'वाह उस्ताद', तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण जाहीर
Padma Vibhushan 2023: तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण जाहीर झाला आहे.
Padma Vibhushan 2023: तबल्याच्या तालावर लोकांना नाचायला भाग पाडणारे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण जाहीर झाला आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या बातमीत झाकीर हुसेन यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Zakir Hussain: वयाच्या तिसऱ्या वर्षी पखावज वाजवायला लागले
झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. तबला वाजवाचे कौशल्य त्यांना त्यांचे वडील अल्ला रक्खा खान यांच्याकडून मिळाले आहे, जे स्वत: प्रसिद्ध तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून पखावज वाजवायला शिकले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला आणि 1973 मध्ये त्यांनी 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' नावाचा पहिला अल्बम लॉन्च केला. त्यांच्या या अल्बमला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Zakir Hussain: व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले पहिले भारतीय संगीतकार
हुसेन हे भारतात तसेच जगात खूप प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार जागतिक मैफलीत भाग घेण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार होते. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना संगीताच्या जगातील सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्कार दोनदा मिळाला आहे. 1992 मध्ये 'द प्लॅनेट ड्रम' आणि 2009 मध्ये 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी.
यासोबतच त्यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हुसेन यांना केवळ तबला वाजवण्यातच रस नव्हता तर त्यांना अभिनयाचीही आवड होती. 1983 मध्ये झाकीर हुसैन यांनी 'हीट अँड डस्ट' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी 1988 मध्ये 'द परफेक्ट मर्डर', 1992 मध्ये 'मिस बेटीज चाइल्डर्स' आणि 1998 मध्ये 'साज' या सिनेमांमध्ये अभिनयाचा हात आजमावला.
झाकीर हुसेन यांनी 1978 मध्ये कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनिकोलासोबत लग्न केले. त्या इटालियन होत्या आणि त्यांच्या मॅनेजर होत्या. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. झाकीर हुसेन हे बिल लॉसवेस यांच्या जागतिक संगीत सुपरग्रुप 'तबला बीट सायन्स' चे संस्थापक सदस्य देखील आहेत. झाकीर हुसेन अनेकदा म्हणाले आहेत की, भारतीय शास्त्रीय संगीत हे स्टेडियमसाठी नसून ते रूम म्युझिक आहे.