Padma Bhushan : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाची खिल्ली उडवली. "काँग्रेसला आझाद यांच्या सेवेची गरज नाही हे खेदजनक आहे. परंतु, देश त्यांच्या योगदानाची दखल घेत ​​आहे. असे ट्विट सिब्बल यांनी केले  आहे.


सरकारने मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना सार्वजनिक कार्यातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरकारच्या या घोषणेनंतर कपिल सिब्बल यांनी ट्विट केले. "गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान देश मान्य करत असताना काँग्रेसला त्यांच्या सेवेची गरज नाही हे खेदजनक आहे.


गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल हे दोघेही कॉंग्रेसच्या 'G23' चा भाग आहेत. 'G23'मधील नेत्यांनी 2020 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसमध्ये आमूलाग्र बदल आणि स्थानिक पातळीवर सक्रिय संघटना बांधणीची मागणी केली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आझाद यांचे अभिनंदन केले. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आझाद यांच्यावर टीका केली आहे.






पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारल्यावरून रमेश यांनी आझाद यांच्यावर टीका केली आहे. “माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला हे करणं योग्य होतं. कारण त्यांना स्वतंत्र राहायचं आहे, गुलाम नाही." असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे. 


दरम्यान, ट्विटरवर सिब्बल यांच्या वक्तव्याचा हवाला देत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. ते म्हणाले, मी गुलाम नबी आझाद यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते एक प्रख्यात राजकारणी, सज्जन आणि राष्ट्रवादी आहेत. आझादजींना पद्मभूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.


 जी 23 गट म्हणजे काय?
काँग्रेसमधील 23 नेत्यांनी पक्षाच्या अवस्थेबाबत 2020 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कार्यात बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. याबरोबरच काही सल्ले आणि पक्षातील कमतरतांबद्दल मत मांडले होते. कॉंग्रेस नेते आनंद शर्मा, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यासह आणखी 20 नेत्यांचा या जी 23 गटात समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या