नवी दिल्ली: काँग्रेस पुन्हा एकदा दुहीच्या वाटेवर आहे का असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. याचं कारण म्हणजे पक्षाच्या अवस्थेबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या जी-23 गटाचा आवाज दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता ताजी पक्षांतर्गत लढाई सुरु झाली आहे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं आघाडीत सामील केलेल्या एका पक्षावरुन.

Continues below advertisement

निवडणुकीची लढाई पश्चिम बंगालमध्ये सुरु झालीय. पण तलवारी उपसल्या जातायत काँग्रेस पक्षातच. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं जी निवडणूकपूर्व आघाडी केली आहे त्यावर पक्षाचेच ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी जाहीरपणे टीका केली आहे. आनंद शर्मा हे सोनिया गांधींना पक्षाच्या अवस्थेबद्दल पत्र लिहिणाऱ्या जी23 गटाचे एक महत्वाचे सदस्य. बंगालमध्ये काँग्रेस-डावे- आयएसएफ अशा तीन पक्षांची एकत्रित आघाडी झालीय. त्यात आयएसएफला सोबत घेण्यावरुन आनंद शर्मांनी नाराजी व्यक्त केलीय.

आता आनंद शर्मा ज्या पक्षाबद्दल एवढं नाक मुरडतायत तो पक्ष नेमका आहे तरी कोण. तर याचं नाव इंडियन सेक्युलर फ्रंट, अर्थात आयएसएफ. हा पक्ष नुकताच म्हणजे जानेवारी महिन्यातच स्थापन झालेला. पश्चिम बंगालमधले एक मौलवी अब्बास सिद्दीकी हे त्याचे अध्यक्ष. नावात सेक्युलर असलं तरी एक कट्टर मुस्लीम पक्ष म्हणून तो नावारुपाला येतोय. आणि अशा कट्टर पक्षाशी काँग्रेसनं युती करायला नको असं आनंद शर्मा म्हणतायत. पण त्याला पश्चिम बंगालचे कांग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तातडीनं उत्तर दिलं.

Continues below advertisement

In Pics : प्रियंका गांधींना 'चहाचा मळा' सत्तेपर्यंत पोहचवणार का?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. त्यापैकी 30 जागा आयएसएफ या पक्षाला आघाडीत सोडण्यात आल्यात. पण या पक्षाच्या जागा डाव्यांच्या कोट्यातून आहेत असा काँग्रेसचा दावा आहे. जागावाटपाची चर्चा काँग्रेसनं आयएसएफशी केली नाही तर डाव्यांशीच केली असंही त्यांचं म्हणणं. काँग्रेसच्या वाट्याला 92 जागा असतील असं सांगितलं जातंय. एकप्रकारे हा आमचा नव्हे तर डाव्यांचा मित्रपक्ष आहे असं काँग्रेस सांगू पाहतेय.

आयएसएफची ओवेसीच्या एमआयएमसोबतही युती होऊ शकते अशी चर्चा सुरु होती. मात्र अचानक त्यांना डावे-काँग्रेसच्या आघाडीत स्थान मिळालं. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरुन जाहीर टीकेमुळे गेल्या दोन तीन दिवसांत पुन्हा काँग्रेसमधला अंतर्गत विरोधाचा आवाज वाढताना दिसतोय..

राज्यसभेतलं विरोधी पक्ष नेते गेल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी नुकतंच जम्मूत एक जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर यांच्यासारख्या काही नेत्यांनी हजेरी लावली. याही कार्यक्रमात पक्षाच्या अवस्थेबद्दल जाहीर विधानं केली गेली होती. त्यापाठोपाठ आता आनंद शर्मा यांचं बंगालच्या आघाडीवरचं हे विधान. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये या गटावर काही कारवाई होऊ शकते का याचीही चर्चा सुरु झालीय.

पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेस मात्र आपसात लढताना पाहायला मिळतेय. केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत काँग्रेसची युती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची सत्ता काँग्रेसला चालते. पण बंगालमध्ये मात्र काहीतरी निमित्त शोधून हे आरोप केले जातायत का असाही प्रश्न त्यातून उपस्थित होतो. त्यामुळे काँग्रेसमधल्या जी-23 गटाची वाटचाल आता फुटीच्या दिशेनं सुरु आहे का अशीही शंका निर्माण होतेय.

काँग्रेसच्या माजी स्वीकृत नगरसेवक सुनीत वाघमारेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक