Pakistan : न्यायमूर्ती आयशा मलिक  (Justice Ayesha Malik)  या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या आहेत. शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, “सर्वोच्च न्यायलयातच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्याबद्दल मी न्यायमूर्ती आयशा मलिक यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा.” यापूर्वी न्यायमूर्ती आयेशा मलिक या लाहोर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होत्या. अशा स्थितीत पाकिस्तानसारख्या परंपरावादी देशाच्या न्यायालयीन इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण आहे.


यासंदर्भातील अधिसूचना कायदा मंत्रालयाने शुक्रवारी जारी केली. अधिसूचनेनुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी न्यायमूर्ती मलिक यांच्या पदोन्नतीला मंजुरी दिली होती. पदाची शपथ घेताच त्यांची नियुक्ती प्रभावी होईल, असेही आदेशात म्हटले आहे. पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने (JCP) या महिन्याच्या सुरुवातीला आयशा मलिक यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियुक्तीशी संबंधित द्विपक्षीय संसदीय समितीने पदोन्नतीमध्ये न्यायमूर्ती आयशा मलिक यांना मान्यता दिली.


पाकिस्तान पीपल्स पार्टीचे खासदार फारुख एच नाईक यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने त्यांच्या नावाला मंजुरी देताना ज्येष्ठतेचे तत्व नाकारले. लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेच्या यादीत न्यायमूर्ती मलिक चौथ्या क्रमांकावर होत्या.


कोण आहेत आयशा मलिक?
आयशा मलिक यांचा जन्म 3 जून 1966 रोजी झाला. त्यांनी कराची ग्रामर स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कराचीच्या सरकारी महाविद्यालयातून  त्यांनी आपली पदवी  पूर्ण केली. त्याबरोबर त्यांनी लाहोर येथील कॉलेज ऑफ लॉ मधून  कायद्याची पदवी पूर्ण केली. नंतर अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पदवीधर झाल्या. आयशा मलिक या पाकिस्तानमधील महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha