Operation Sindoor : जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त, निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूद अझहरवर हिशोब देण्याची वेळ
Masood Azhar : ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवाही मसूद अझहर जरी बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातील 10 जणांना आणि खास मर्जीतल्या चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अझहरचंही (Masood Azhar) कंबरडं मोडलं. मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा खात्मा केला. निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूदच्या कुटुंबावरच हिशेब देण्याची वेळ आल्यानं अझहर हादरून गेला.
पाकिस्तानातल्या बहवालपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय (Jaish-e-Mohammed). दहशतवाद्यांचा अड्डा, ट्रेनिंग कॅम्प आणि मदरसा असलेल्या या मुख्यालयाची आता अशी अवस्था झाली आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मरकज सुबहान अल्ला नावानं ओळखलं जाणारं जैशचं हे मुख्यालय उद्ध्वस्त झालं. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूर अझरचा हा गड होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं त्याचीच निवड का केली, याचं उत्तर सैन्यानं दिलं.
मसूद अझहरचे मुख्यालय उद्ध्वस्त
मरकज सुबहान अल्लावर हल्ला करून दहशतवादी मसूर अझरचं कंबरडंच भारतीय सैन्यानं मोडलं आहे. या हल्ल्यात मसूद अझहर बचावला. पण त्याच्या कुटुंबातल्या 10 जणांचा आणि 4 जवळच्या सहकाऱ्यांचा खात्मा झाला. हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला. तर रौफचा मुलगा हुजैफा आणि रौफची सून आणि मसूदच्या बहिणीचा मृत्यू झाला. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
हल्ल्यात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्यानं शेकडो जणांचा बळी घेणारा मसूद अझहर हादरून गेला. 'भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं, भारत आता कुणाची दया करणार नाही' अशी त्याची प्रतिक्रिया आहे.
रक्तरंजित खेळ अझहरवर उलटला
भारतात शेकडो निष्पापांचे बळी घेणारा दहशतवादी आता रडकुंडीला आला. त्यानं केलेला रक्तरंजित खेळ आता त्याच्यावरच उलटल्यानं त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मरकज सुबहान अल्लावरचा हल्ला भारतीय सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष आहे. कारण भारताच्या सीमेपासून मसूदचं मुख्यालय बहावलपूर तब्बल 100 किलोमीटर आत आहे. बहवालपूर लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे.
पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातलं बहावलपूर हे पाकिस्तानातलं 12 वं सर्वात मोठं शहर आहे. इथंच 18 एकर परिसरात हे जैशचं मुख्यालय पसरलं आहे. आजूबाजूच्या इमारतींना अजिबात धक्का न लावता भारताच्या क्षेपणास्त्रांनी अझहरच्या मुख्यालयाचा अचूक आणि नेमका वेध घेतला. आजवर भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट अझहरनं रचला.
- 2000 साली अझहरनं जैश ए मोहम्मदची स्थापना केली होती.
- 2001 मधला संसदेवरचा हल्ला, 2016 मधला पठाणकोट आणि 2019 मधला पुलवामा हल्ल्यात जैशचा समावेश होता.
- 1999 मध्ये कंदाहार विमान प्रकरणात सोडलेल्या तीन दहशतवाद्यांत अझहरचा समावेश होता.
मसूद अझहर बचावला असला तरी त्याला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला आहे. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा मसूद अझहरचा खात्मा कधी आणि कसा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.























