नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केलेल्या भाषणाची चर्चा होतेय. त्यांनी आपल्या सात मिनीटाच्या भाषणात आरोग्य व्यवस्था, युवकांचा रोजगार, सरकारचा खासगीकरणाचा सपाटा, प्रजासत्ताक दिनाचा हिंसाचार आणि शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला.


सरकारच्या विविध योजनाचा तळागाळातल्या लोकांना फायदा झाल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं होतं. त्यावर सरकारचे अभिनंदन करत डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या संसद बांधणीवर टीका केली. कोरोनाच्या काळात ज्या देशाची आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली असेल त्या देशाची प्राथमिकता काय असायला हवी असा प्रश्न विचारला. सरकारची प्राथमिकता काय हवी, नवीन संसद भवन की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज असं सार्वजनिक हॉस्पिटल असाही प्रश्व त्यांनी विचारला. देशाच्या आरोग्य व्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर सरकारने आत्मचिंतन करावे अशी विनंती अमोल कोल्हे यांनी केली.


केंद्र-राज्य संबंधाचा मुद्दा उपस्थित करताना खासदार कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे 25 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे अशी आठवण करुन दिली. ही रक्कम तातडीने देण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली.


डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "नीम आणि नॅशनल अप्राईन्टिस यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषण व्यवस्था ठरली आहे. मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते. यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या धोरणांचा सरकारने पुनर्विचार करावा."


PM Modi's Emotional Speech in RS : राज्यसभेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर, म्हणाले...


ओएलएक्सची जाहिरात सरकार प्रभावी करतंय
सरकारने निर्गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वकाही विकण्याचा सपाटा लावलाय असं सांगताना डॉ. कोल्हे म्हणाले की, "या अभिभाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकले होते तेंव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की 'मुठभर भांडवलदार निर्भर' भारताची?"


मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणाऱ्या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.


शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा कट
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या 200 भारतीयांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याचं आश्चर्य डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला सांगण्यात आलं की आंदोलन करणारे हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते आडते आहेत. काही काळानंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत. त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मीडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषीत करुन टाकले."


शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "जो बाप आपल्या अठरा वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ, तुला लष्करात भरती व्हायचंय. जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे. तर हा असा बाप, आई देशद्रोही कसे असू शकतात?"


Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयकाला राज्यसभेत मंजूरी


मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे, त्याचवेळी त्याचा 70 वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय. या अशा परिस्थितीत 'जय जवान,जय किसान' कसं म्हणायचं? असा सवाल उपस्थित करुन डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर सडकून टीका केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला होता. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते, त्यामुळे पंतप्रधानांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं असंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या या शब्दावर टीका करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, "ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत.ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो."


बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे असा सवाल विचारताना अमोल कोल्हे म्हणाले की, "राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात चाणक्याची वचनांचा संदर्भ दिला. पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की याच आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की, जेव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेव्हा समजून जा की त्याच्या शासन काळाचा अंत होणार हे निश्चित आहे."


आपल्या भाषणाचा शेवट करताना शासनाने शेतकरी आंदोलनावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा, अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केली. हे शक्य झालं तरच आपण म्हणू शकू 'जय जवान,जय किसान' असे ते म्हणाले.



PM Modi Rajya Sabha Speech: शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, चर्चेतून प्रश्न सोडवू : पंतप्रधान मोदी