पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद, दोन जखमी
जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं झालं आहे. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे, तर दोन जवान जखमी झाले आहेत.
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे तर दोन जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
सीमेलगत असलेल्या रहिवाशी परिसरात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत असून नागरिकांना यामुळे नुकसान होण्याची सतत भीती असते. येथील लोक जीव मुठीत धरून राहत आहेत. शनिवारी देखील पाकिस्तानने पुंछच्या चिरिकोट परिसरात गोळीबार केला.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलं असून पाकिस्तानच्या चौक्याही भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या स्थानिकांनी आनंद साजरा केला. पाकिस्तानवरील हल्ला पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. या भागात राहणारे लोक पाकिस्तानकडून होणाऱ्या नेहमीच्या त्रासाबद्दल सांगत आहेत.
भारतीय लष्कराने केलेल्या प्रतिहल्लानंतर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार काही वेळ बंद झाला. मात्र त्यानंतर पाकिस्ताने मोठ्या शस्त्रांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झाला तर दोन भारतीय जवान जखमी झाले.