(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभेलाही युती राहणार, पण मुख्यमंत्री भाजपचाच; अमित शाहांचा कोअर कमिटीला कानमंत्र
केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होईलच, मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होईल यासाठीही मेहनत घ्या, असा कानमंत्र अमित शाहांनी दिल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या भाजप कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचं आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाआधी होण्याची शक्यता आहे. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं या बैठकीनंतर स्पष्ट होत आहे.
पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज इतक्यात नाही. देशभरातील 4-5 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय एकत्र घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंना अजून काही काळ संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रकिया लांबली तर विधानसभेची निवडणूकही रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात लढवली जाण्याची शक्यता आहे.