(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... तर भारतात कोरोनाची भयंकर तिसरी लाट येणार, IMAचा इशारा
Omicorn Corona Update : आता कठोर पावलं उचलली नाही तर कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे भयंकर तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने दिला आहे.
Omicorn Corona Update : देशात कोरोनाचा नवा व्हेरियंटचे ओमायक्रॉनचे (Omicron Variant) 23 रुग्ण आढळले आहेत. यामुळं आता कठोर पावलं उचलली नाही तर कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे भयंकर तिसरी लाट (COVID-19 Third Wave India) येऊ शकते, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने दिला आहे.
आयएमएने म्हटलं आहे की, भारतातील प्रमुख राज्यांत ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण समोर आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा, अशी केंद्र सरकारला विनंती आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल आणि सरचिटणीस जयेश एम. लेले यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे की, अद्याप मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय झालेला नाही. सरकारने 12 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना लस देण्याबाबतही लवकर विचार करावा, अशी मागणीही आयएमएने केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण आढळले आहेत. लोकांनी गर्दीच्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होऊ नये, मास्क घालावा, हात धुवावेत, कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही आयएमएने केले आहे.
IMAनं म्हटलं आहे की, ओमायक्रॉन आता जगातील 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. हा व्हेरियंट डेल्टापेक्षा कमी घातक असला तरी याचा फैलाव डेल्टापेक्षा पाच ते दहा पटीने जास्त आहे. त्यामुळेच आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे व्हायला हवे. प्रवासबंदी घालण्याची गरज नाही मात्र गरज असेल तरच प्रवास करा, असा आमचा सल्ला राहील. सरकारने प्रामुख्याने गर्दी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत, असं आयएमएनं म्हटलं आहे.
अशावेळी आरोग्याच्या पातळीवर आपण सज्ज असलं पाहिजे आणि सक्षमही असलं पाहिजे. यासाठी या महामारीत कोविड योद्धे म्हणून जे आरोग्य कर्मचारी काम करत आहेत त्यांना कोविडवरील तिसरी लस देण्याबाबत विचार केला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी आयएमएने सरकारकडे केली.
संबंधित बातम्या