(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार नागरिकांपैकी 13 हजार भारतीय मायदेशी, सुमीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण 20 हजार भारतीयांपैकी 13 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. पण तरीही सुमीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे हे एक आव्हान आहे.
Operation Ganga : भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' आता पूर्ण गतीने सुरु केले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण 20 हजार भारतीयांपैकी 13 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. पण तरीही सुमीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे हे एक आव्हान आहे. कारण या भागात दोन सैन्यांमध्ये युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत सुमारे 700 विद्यार्थ्यांना बाहेर काढणे मोठे आव्हानच नाहीतर, पण जीवालाही धोका आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना खार्किवमधून बाहेर काढण्यात आले
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतीय विद्यार्थ्यांना खार्किवमधून बाहेर काढण्यात आले आहे. पिसोचिनमधून काही तासांत सर्वांची सुटका केली जाईल. आता सरकारचा भर फक्त सुमीवर आहे. त्यांच्यासाठी, सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे, परंतू, सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ते विद्यार्थी तणावाखाली असले तरी ते सुरक्षित ठिकाणी आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. सरकार त्यांच्या सतत संपर्कात आहे.
आजही शेकडो विद्यार्थी 13 फ्लाइटमधून मायदेशी परतणार
सुमी व्यतिरिक्त भारतीय विद्यार्थी ज्या सीमेवर पोहोचतात त्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात पोहोचवण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. आजही शेकडो विद्यार्थी 13 फ्लाइटमधून मायदेशी परतणार आहेत. सकाळी युक्रेनमधील 183 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून राष्ट्रीय राजधानीत पोहोचले आहे.
'ऑपरेशन गंगा' च्या माध्यमातून भारतीयांची सुटका
आतापर्यंत सुमारे 13 हजार भारतीय 63 फ्लाइटने घरी पोहोचले आहेत.
11 मार्चपर्यंत एकूण 100 उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत.
हवाई दलात 6 खासगी कंपन्यांची विमानेही सहभागी होती.
भारत सरकारने 26 फेब्रुवारीपासून ऑपरेशन गंगा सुरू केले आहे.
दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनच्या पूर्वेकडील सुमी शहरात अडकलेल्या भारतीयांबद्दल भारत सध्या चिंतेत आहे. भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सुमी भागातील लोकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी त्वरित युद्धविराम करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारला विद्यार्थ्यांचे हाल आणि त्यांची मानसिक स्थिती समजते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. भारताने विविध माध्यमांद्वारे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना तात्काळ युद्धविराम करण्यास सांगितले आहे जेणेकरून लोकांना संघर्षग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढता येईल.