(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Train Accident : मृतांची संख्या वाढली, बिहारमधील 17 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Odisha Train Accident: बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे.
Odisha Train Accident: ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (16 जून) उपचारादरम्यान बिहारमधील (Bihar) एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृतांचा आकडा 290 झाला आहे. या अपघातात एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते.
बिहारमधील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय प्रकाश रामचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कटक येथील एससीबी मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रकाश राम हा देखील शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करत होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शासकीय रुग्णालयातील सर्जरी वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.
प्रकाश रामच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रकाश रामच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या डाव्या पायाचा काही भाग गुडघ्याखाली कापण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वी डाव्या गुडघ्याच्या वरचे दुसरे शवविच्छेदन केले होते. रक्ताच्या संक्रमणानंतर संसर्ग झाला होता. गुरुवारी (15 जून) रात्रीपर्यंत रुग्णाची प्रकृती ठीक होती. तो बोलत होता, खात होता मात्र शुक्रवारी सकाळी त्याचा अचानक मृत्यू झाला. प्रकाश रामच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. अद्याप त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मंगळवारनंतर रुग्णालयात मरण पावलेला प्रकाश हा दुसरा व्यक्ती आहे. बिहारमधील बिजय पासवान यांचाही मंगळवारी एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात मृत्यू झाला होता.
81 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही
दरम्यान, भुवनेश्वरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ठेवण्यात आलेल्या 81 मृतांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. लोक डीएनए चाचणीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. 78 कुटुंबांनी डीएनए नमुने दिले आहेत.
रेल्वेमंत्री लवकरच बालासोरला भेट देणार
एएनआय वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे 21 जून रोजी ओडिशातील बालासोरला भेट देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांचा दौरा होणार आहे. बालासोर येथील योग कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच रेल्वे मंत्री रेल्वे अपघातातील मृतांची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रेल्वेमंत्री वैष्णव हे कठीण प्रसंगी बचाव कार्यात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानणार आहेत.
भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखलं जातं. भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वेचं जाळं पसरलं आहे. भारतीय रेल्वेचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. क्वचितच असा एखादा जिल्हा किंवा गाव असेल, अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. भारतात 13,500 हून अधिक रेल्वे गाड्या धावतात. आजही बहुतेक लोक प्रवासासाठी ट्रेनचीच निवड करतात.
महत्त्वाच्या बातम्या: