स्वत:च्याच लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; आमदार म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही!
BJD MLA Bijaya Shankar Das : ओडिसामधील बीजू जनता दल (बीजद)चे आमदार विजय शंकर दास हे आपल्याच लग्नाला पोहोचले नाहीत, त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Odisha MLA Marriage: एका आमदार महोदयांच्या विरोधात त्यांच्याच लग्नाला न पोहोचल्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओडिसामधील बीजू जनता दल (बीजद)चे आमदार विजय शंकर दास (BJD MLA Bijaya Shankar Das) हे आपल्याच लग्नाला पोहोचले नाहीत, त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आमदार विजय शंकर दास (30) यांच्या विरोधात जगतसिंहपूर सदर पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेनं आमदारावर आरोप केला आहे की, वचन देऊनही हे आमदार विवाह नोंदणी कार्यालयात आले नाहीत. जगतसिंहपूर सदर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवास साहू यांनी सांगितलं की, आमदार दास यांच्याविरोधात या महिलेच्या तक्रारीनंतर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार सदर महिला आणि आमदार दास यांनी 17 मे रोजी विवाह नोंदणी कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला होता. यानंतर ती महिला तिच्या परिवारासह निश्चित केलेल्या तारखेला लग्नासाठी विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचली. मात्र आमदार विजय शंकर दास तिथं आले नाहीत. महिलेनं दावा केला आहे की, गेल्या तीन वर्षांपासून आमचे संबंध आहेत. त्यांनी या तारखेला लग्नाचं वचन दिलं होतं. मात्र ते आले नाहीत. मला आता त्यांचा भाऊ आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्याकडून धमक्या येत आहेत. त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलं नाही आणि ते माझा फोन देखील उचलत नाहीत.
आमदार दास यांनी म्हटलं आहे की, मी लग्नाला नकार दिलेलाच नाही. लग्नाच्या नोंदणीसाठी आणि 60 दिवस बाकी आहेत. त्यामुळं मी आलो नाही. मला तिनं (आरोप केलेल्या महिलेनं) काहीही कल्पना दिली नाही. विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याबाबत मला काहीच माहिती नव्हती.
आमदार दास आणि सदर महिलेचे काही फोटो देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.