(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nupur Sharma Case : कोलकाता पोलिसांकडून नुपूर शर्मांविरोधात लूक आऊट नोटीस जारी, दोन वेळा बजावले होते समन्स
prophet muhammad row : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी शर्मा यांच्याविरोधात आंदोलने झाली.
prophet muhammad row : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) लूक आऊट नोटीस जारी केली आहे. कोलकाता पोलिसांनी नुपूर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्माविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी शर्मा यांच्याविरोधात आंदोलने झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नुपूर शर्मा यांना कोलकाता पोलिसांच्या पूर्व उपनगर विभागाच्या अंतर्गत असलेल्या नरकेलडांगा पोलीस ठाण्यातून वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांना 20 जून रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, नुपूर शर्मा यांनी सुरक्षेचे कारण सांगून हजर राहण्यास नकार दिला.
कोलकाता येथील एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात तक्रारही करण्यात आली होती. नुपूर शर्मालाही एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशनने हजर राहण्यास सांगितले होते. नुपूर शर्मा या 25 जून रोजी पोलीस ठाण्यात हजर होणार होत्या. परंतु, नुपूर शर्मांनी कोलकाता पोलिसांना ईमेलद्वारे हजर होण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता. शहरात आल्यास हल्ल्याची भीती वाटत असल्याचे कारण त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी आता त्यांना लुक आऊट नोटीस सारी केली आहे.
नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने झाली. पश्चिम बंगालमधील हावडा, नादिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. यादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी हावडा जिल्ह्यातील डोमजूर पोलीस ठाण्यावर हल्ला देखील झाला. आंदोलनकांनी यावेळी पोलिसांची वाहने जाळली. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना फटकारले
वादग्रस्त टिप्पण्यांवरून देशभरात तणाव निर्माण झाल्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपने पक्षातून निलंबित केले. त्यानंतर नुपूर शर्माविरुद्ध अनेक राज्यांमधील पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने देखील नुपूर शर्मांना फटकारले आहे. न्यायालयाने नुपूर शर्माला देशाची माफी मागण्यास सांगितले होते.