मुंबई : कोरोना व्हायरसची देशभरात दहशत पसरलेली असताना राज्यात कोरोना बाधित एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस संशयित रुग्णांच्या तपासण्या सुरु आहेत. मात्र अद्याप कुणीही पॉझिटिव्ह आढळलेलं नाही. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.


महाराष्ट्रात दोन संशयित रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईतील आणि पुण्यातील दोघांचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट्स समोर आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. राज्य सरकार कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आणि रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेत आहे आणि नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घेण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, सरकारकडून योग्य उपाययोजना सुरु आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.


Coronavirus | भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर : डॉ. हर्ष वर्धन


कोरोनाबाबत माहितीसाठी हेल्पलाईन नंबर जारी


कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता या संदर्भात कुणाला काहीही माहिती हवी असल्यास राज्य शासनाने हेल्पलाईन सुरू केली आहे. याचा 02026127394 हा राज्य नियंत्रण कक्ष क्रमांक आहे आणि 104 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास शंकांचं निरसन केलं जाणार आहे.


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या 12 देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत 401 प्रवासी आले आहेत.


जगभरात 92 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये चीनमधील 80 हजार 304 रुग्ण आणि इतर जवळपास 72 देशांतील 10 हजार 566 रुग्णांचा समावेश आहे. चीनच्या आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 2946 लोकांचा बळी गेलाय. इतर देशांमध्ये 200 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


संबंधित बातम्या