बँकॉक : थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवार एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झाला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलं आहे.


डॉक्टर क्रिएंगसक यांनी सांगितलं की, 'उपचारानंतर 48 तासांनी झालेल्या लॅब टेस्टमध्ये महिलेच्या शरीरात करोना विषाणू आढळून आले नाहीत. तसेच उपचारानंतर 12 तासांनी महिला अगदी चालू फिरूही लागली. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, 'कोरोनाच्या रूग्णावर उपचारासाठी अॅन्टी-फ्लू आणि अॅन्टी-एचआय औषधांचा वापर केला गेला. हे औषध तयार करण्यासाठी ओस्टेल्टामिविर, लोपिनवीर आणि रटनवीर औषधांचा वापर करण्यात आला.


पाहा व्हिडीओ : Corona Virus | केरळमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला | ABP Majha



कोरोना विषाणूमुळे चीनमधील 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू


चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये 19 कोरोनाची लागण झालेले रूग्ण समोर आले आहेत. असं सांगण्यात येत आहे की, कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधील वुहान शहरातून झाली आहे. चीनमध्ये प्राणघातक अशा कोरोना व्हायरसने आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 11,791 लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. चीननंतर कोरोना व्हायरसची लागण झालेले सर्वाधिक रूग्ण जपानमध्ये आहेत. जपानमध्ये आतापर्यंत 20 लोक या व्हायरसला बळी पडले आहेत. तर थायलंडमध्ये 8 लोकांना तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. तर 11 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


आरोग्य मंत्र्यांनी हॉस्पिटलचा केला दौरा


रविवारी एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये थायलंडमधील आरोग्य मंत्री अनुतिं चारणविरकुल कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांवर उपचार करण्यात येत असलेल्या हॉस्पिटलचा दौरा करताना आणि रूग्णांसोबत संवाद साधताना दिसून आले आहेत.


लक्षणे कोणती आहेत ?


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.


काय काळजी घ्याल?


तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.


संबंधित बातम्या : 


Corona Virus | केरळमध्ये कोरोनाचा आढळला दुसरा रूग्ण


चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरूप