SCO Summit 2025 : भारत-चीन-रशियाची नवी आघाडी, जिनपिंग अन् पुतीन यांच्यासोबत नवे समीकरण; मोदींचा नवा मास्टरस्ट्रोक, अमेरिकेला हादरा
SCO Summit 2025 : भारत-चीन थेट हवाईसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चेत सकारात्मक भूमिका घेतली गेली. SCO बैठकींमुळे भारत-रशिया तसेच भारत-चीन संबंधांना नवीन गती मिळणार आहे.

नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एकत्र आले. या भेटीने अमेरिकेच्या राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडवली आहे. तिआनजिन येथे झालेल्या या शिखर परिषदेतून भारताला महत्वपूर्ण यश मिळालं असून पंतप्रधान मोदींचा हा दौरा राजनैतिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला आहे.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा झाला. अशा परिस्थितीत पुतिन आणि जिनपिंगसोबत मोदींच्या एकत्रित उपस्थितीने "नव्या धुरी"ची स्पष्ट छटा दिसून आली. या तिघांच्या सामूहिक भेटीचे संदेश थेट वॉशिंग्टनपर्यंत पोहोचले असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
द्विपक्षीय बैठकींचे यश
मोदींची शी जिनपिंग यांच्यासोबत एक तास आणि पुतिनसोबत जवळपास 50 मिनिट बैठक झाली. सर्वात लक्षवेधी क्षण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एका कारमध्ये एकत्र प्रवास केला. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. डिसेंबर 2025 मध्ये पुतिन भारत दौऱ्यावर येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.
याशिवाय भारत-चीन थेट हवाईसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चेत सकारात्मक भूमिका घेतली गेली. या बैठकींमुळे भारत-रशिया तसेच भारत-चीन संबंधांना नवीन गती मिळणार आहे.
दहशतवादावरील ठाम भूमिका
SCO च्या संयुक्त निवेदनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला. यापूर्वी असे झाले नव्हते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत म्हटले की, "दहशतवादावर दुहेरी मापदंड कधीच मान्य होऊ शकत नाहीत."
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत मोदींनी ही ठाम भूमिका मांडल्यामुळे भारताचे राजनैतिक वजन अधिक ठळक झाले.
रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा
मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींसोबत आधीच संवाद साधला होता. पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी युक्रेन युद्धावर सखोल चर्चा केली आणि शांततेचा मार्ग शोधण्याची आवश्यकता अधोरेखित केली. मोदी म्हणाले, “ही संपूर्ण मानवजातीची मागणी आहे की हा संघर्ष लवकर संपुष्टात यावा आणि कायमस्वरूपी शांती प्रस्थापित व्हावी.”
भारताला मिळालेले 5 मोठे फायदे
- पुतिन डिसेंबर 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार
- भारत-चीन थेट फ्लाइट पुन्हा सुरू करण्याची घोषणा
- दहशतवादाविरोधात पहलगाम हल्ल्याचा संयुक्त निवेदनात समावेश
- रशिया-भारत मैत्रीचे प्रतीक म्हणून मोदी-पुतिन यांचा कार प्रवास
- आंतरराष्ट्रीय स्तरावर "मोदी-पुतिन-जिनपिंग" नवी धुरी म्हणून उभारणी
तिआनजिन परिषदेत भारताने आपल्या राजनैतिक ताकदीची ठाम छाप सोडली असून येत्या काळात त्याचे परिणाम जागतिक राजकारणात स्पष्ट दिसतील अशी चर्चा सुरू आहे.
ही बातमी वाचा:























