पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद; नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासह अनेक मंत्र्यांचे खाते बदलले होते. खातेबदल झाल्याने सिद्धू नाराज होते.
नवी दिल्ली : पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांना न पाठवला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सिद्धू यांनी जून महिन्याच्या 10 तारखेलाच राजीनामा दिला आहे. मात्र आज त्यांनी ट्वीट करत आपण राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे.
My letter to the Congress President Shri. Rahul Gandhi Ji, submitted on 10 June 2019. pic.twitter.com/WS3yYwmnPl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 14, 2019
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. दोन्ही नेते एकमेकांविरोधात जाहीरपणे बोलत होते. दोघांमधील वाद राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचला होता. मात्र याची हायकमांडने गंभीर दखल घेतली नाही.
यावर्षी मे महिन्यात सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासह अनेक मंत्र्यांचे खाते बदलले होते.
सिद्धूकडे नागरी प्रशासन विभागाची जबाबदारी होती. ती काढून त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र खातेबदल झाल्याने सिद्धू नाराज होते, त्यामुळे त्यांनी आपल्या विभागाचा पदभारही स्वीकारला नव्हता. त्यानंतर अखेर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.