जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार दहशतवादी ठार
दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीदरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांधली चकमक संपली आहे. हे चारही दहशतवादी ट्रकमध्ये लपले असल्याचा दावा लष्कराने केला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.
मोठा अनर्थ टळला
मिळालेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी ट्रकमधून जात होते. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती. गोळीबार सुरू होताच सुरक्षा दलांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकला चारही बाजूने वेढले आणि दहशतवाद्यांना ट्रकमधून बाहेर पडू दिले नाही. कारण आजूबाजूचा परिसर जगालाचा भाग होता, जर दहशतवादी ट्रकमधून बाहेर पडले तर चकमकी बराच काळ चालू शकली असती. लष्कराच्या तत्परतेमुळे दहशतवाद्यांना ट्रकमधून बाहेर पडता आले नाही आणि मोठा अपघात टळला.
लष्कराला चारही दहशतवाद्यांचा खात्मा करणे सोपे नव्हते. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक हत्यारं होती. दहशतवादी सतत गोळीबार करत होते. परंतु सुरक्षा दलांनी दोन तासांत दहशतवाद्यांना ठार करत ऑपरेशन संपवले.
दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीदरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.