Rajdhani Express : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला 50 वर्षे पूर्ण! रेल्वेच्या इतिहासात आणखी एका विशेष दिवसाची भर
Mumbai-New Delhi Rajdhani Express : देशातील प्रिमियम पॅसेंजर ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने 50 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Mumbai-New Delhi Rajdhani Express : भारतीय रेल्वेने (Indian Railway) आपल्या 169 वर्षांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. वाफेच्या इंजिनापासून ते बुलेट ट्रेनपर्यंतचा (Bullet Train) प्रवास आपण सर्वांनीच पाहिला आहे. रेल्वेच्या इतिहासात आणखी एका विशेष दिवसाची भर पडली आहे. देशातील प्रिमियम पॅसेंजर ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने 50 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये म्हटलंय...
पश्चिम रेल्वेची प्रतिष्ठित ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने आज आपल्या प्रवासाला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय रेल्वे आणि आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. असं म्हटलंय.
पश्चिम रेलवे की प्रतिष्ठित ट्रेन मुंबई - नई दिल्ली राजधानी एक्सप्रेस ने आज अपनी यात्रा के 50 वर्ष पूर्ण कर लिए हैं।
— Western Railway (@WesternRly) May 17, 2022
भारतीय रेल और हम सब के लिए यह गर्व का क्षण है।#RajdhaniKe50SaalBemisal pic.twitter.com/0FkbsfoAxa
1972 रोजी बॉम्बे सेंट्रल ते राजधानी प्रवास सुरू केला
50 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 मे 1972 रोजी या ट्रेनने बॉम्बे सेंट्रल ते राष्ट्रीय राजधानी असा आपला प्रवास सुरू केला होता. तसे, भारतातील पहिली संपूर्ण वातानुकूलित ट्रेन नवी दिल्ली आणि हावडा दरम्यान धावली. पूर्वी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या इतर गाड्या होत्या. आता राजधानी एक्सप्रेसच्या 25 गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आहेत.
प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार?
पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांच्या मते, भारताची ही प्रमुख ट्रेन देशाच्या राजधानीशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या 50 वर्षांमध्ये, या मार्गांवर आणखी दोन राजधानी एक्स्प्रेस (शताब्दी), तसेत फुल एसी गाड्या जसे की गरीब रथ, युवा एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसने भारतीय रेल्वे ट्रॅकवर आपली मजबूत पकड राखून ठेवत, गेल्या 50 वर्षांमध्ये आपले लोकोमोटिव्ह, कोच आणि सेवा सातत्याने अपग्रेड केल्या आहेत. मुंबई आणि दिल्ली दरम्यान 19 तास 5 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा प्रवास 15 तास 50 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. भविष्यात प्रवासाचा वेळ आणखी कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असं रेल्वेकडून सांगण्यात येतंय. राजधानी ही 1988 पर्यंत भारतीय रेल्वेमधील सर्वात वेगवान ट्रेन होती, ज्याचा कमाल वेग 120 किमी प्रतितास होता. आता आधुनिक वंदे भारत आणि शताब्दी गाड्या वेगाने धावतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षांत ट्रॅक अपग्रेडेशनमुळे राजधानी 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. यामुळे प्रवासाचा वेळ 12 तासांपर्यंत कमी होईल.
प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय रेल्वे
आजही राजधानी एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय रेल्वे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानीच्या गाड्यांना सर्व वर्गांच्या गाड्यांपेक्षा प्राधान्य दिले जाते. तसेच राजधानी चालवण्यासाठी उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सर्वात वरिष्ठ लोको पायलटचीच निवड केली जाते. अशी माहिती रेल्वेकडून सांगण्यात आली