Mukesh Ambani : मुकेश अंबानी जगातील 11 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्या क्लबमध्ये सामील
मुकेश अंबानी यांचा व्यवसाय दूरसंचार, रिटेल आणि ऊर्जा या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये आहे. त्यांनी जिओ टेलिकॉममधील हिस्सा विकून 2020 मध्ये 27 अब्ज डॉलर्स उभारले.
मुंबई : केवळ देशच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आणखी एक इतिहास रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी इलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्यासह जगातील $100 अब्ज क्लबमध्ये सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींच्या संपत्तीत या वर्षी 23.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 100.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाच्या क्रमवारीत मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षात त्यांची संपत्ती $23.8 अब्जांनी वाढली आहे. मुकेश अंबानी यांचा व्यवसाय दूरसंचार, रिटेल आणि ऊर्जा या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये आहे. त्यांनी जिओ टेलिकॉममधील हिस्सा विकून 2020 मध्ये 27 अब्ज डॉलर्स उभारले.
इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती $222.1 अब्ज
एलन मस्कची एकूण संपत्ती सध्या $ 222.1 अब्ज आहे तर जेफ बेझोसची निव्वळ संपत्ती $ 190.88 अब्ज आहे. बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याची निव्वळ संपत्ती $ 127.9 अब्ज आहे. वॉरेन बफेट दहाव्या क्रमांकावर आहे. त्याची निव्वळ संपत्ती $ 103 अब्ज आहे. मुकेश अंबानी 2008 पासून फोर्ब्सच्या यादीत पहिल्या 100 श्रीमंत भारतीयांमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांची संपत्ती आता $ 100 अब्ज, म्हणजे 7.5 लाख कोटी रुपये झाली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांची संपत्ती $ 92.7 अब्ज होती. मग या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमती प्रचंड वाढल्या. यामुळे अंबानींची संपत्तीही वाढली आहे. या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 2,537 रुपये होता. शुक्रवारी तो 3.84%च्या वाढीसह 2,670 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षातील या स्टॉकची ही सर्वोच्च पातळी आहे.
रिलायन्सची मार्केट कॅप 16.93 लाख कोटी रुपये
शेअरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पहिल्यांदाच रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 16.93 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. पुढील आठवड्यात ती 17 लाख कोटी रुपयांवर पोहोचू शकते. रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये प्रमोटर्स, म्हणजेच मालकी हिस्सेदारी 50.59 टक्के आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई आहे. प्रमोटर्स गटात एकूण 48 भागधारक आहेत. 49.41% हिस्सा जनतेकडे आहे. कंपनीचे एकूण 676 कोटी शेअर्स आहेत.