देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


"शाहीनबागेत जी फौज होती, तीच..."; कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बृजभूषण सिंह यांची टीका


रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारलं आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसेच, बृजभूषण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कुस्तीपटूंकडून सातत्याने होत आहे. अशातच आता बृजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाची तुलना शाहीन बागशी केली आहे. तसेच, अनेक गंभीर आरोपही केले आहेत. "माझ्या पक्षानं मला राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन... 'तुकडे तुकडे गँग', शाहीन बाग, 'किसान आंदोलन'मध्ये सामील असलेल्या फौजांचं खरं लक्ष्य मी नसून पक्ष (भाजप) त्यांचं खरं लक्ष्य आहे. या खेळाडूंना पैसे दिले जातात," असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं. वाचा सविस्तर


...तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही, लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत कोलकाता हायकोर्टाची टिप्पणी


कोलकाता उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान विवाहित व्यक्तींबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, "जर एखाद्या व्यक्तीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी आपल्या लिव्ह-इन पार्टनरला त्याचं लग्न आणि मुलांबद्दल सांगितलं असेल तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही." यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला. ज्यामध्ये न्यायालयाने एका हॉटेल एक्झिक्युटिव्हला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची फसवणूक केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आरोपीने 11 महिने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देत ब्रेकअप केलं होतं. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हॉटेल एक्झिक्युटिव्हनं कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाचा सविस्तर


पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्समध्ये घट; पेट्रोल-डिझेल आणि ATF वर किती टॅक्स?


केंद्र सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स कमी करुन तो 4100 रुपये प्रति टन केला आहे. यापूर्वी पेट्रोलियम क्रूडवर 6400 रुपये प्रति टन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता. नवे कमी केलेले दर आजपासून म्हणजेच, मंगळवारपासून लागू झाले आहेत आणि सरकारने अधिकृत अधिसूचनेद्वारे याची माहिती दिली आहे. डॉलरच्या बाबतीत, सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स 50.14 डॉलर प्रति टन कमी केला आहे. वाचा सविस्तर


अफजल अन्सारींचं लोकसभा सदस्यत्व रद्द


माफिया मुख्तार अन्सारीचा मोठा भाऊ अफजल अन्सारी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं सोमवारी (1 मे) यासंदर्भात अधिसूचना जारी केली. अफजल अन्सारी हे सहा वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. दरम्यान, अफजल यांना गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने गँगस्टर अॅक्ट प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. वाचा सविस्तर


बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ; 11 ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता


बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा असू शकेल. हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता. वाचा सविस्तर 


कर्नाटक निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता? सर्वेक्षणातून खुलासा


कर्नाटकातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय प्रचार जोरात सुरु आहे. भाजपकडून वातावरण निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत. तसेच काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी सत्तेत परतण्यासाठी जोर लावत प्रचारात व्यस्त आहेत. अशा निवडणुकीच्या वातावरणात जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी लोकनीती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने NDTVसाठी एक सर्वेक्षण केलं आहे. वाचा सविस्तर


पाकिस्तानातील वैष्णो देवी मातेच्या उत्सवाला दोन वर्षानंतर सुरुवात


कोरोनामुळे दोन वर्ष खंड पडलेल्या पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील हिंगलाज माता यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हा पाकिस्तानातील सर्वात जुना उत्सव असून यासाठी फक्त भारतातील नाही तर जगभरातील भाविक पाकिस्तानात जातात. बलुचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यातील कुंड मलिर भागात हे प्राचीन मंदिर आहे. हिंदू भाविकांसाठी हे पवित्र मानले जाते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पाकमधील हे शक्तिपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे.   पाकिस्तानातील हिंदू बांधवांचे हे एक आस्थेचे केंद्र आहे. केवळ हिंदू नाही, तर मुस्लीम बांधवही या मंदिरात सेवा करण्यासाठी येतात. वाचा सविस्तर


2nd May In History : लिओनार्डो दा विंचीचा मृत्यू, सत्यजित रे यांचा जन्म, महात्मा गांधी हत्या खटल्याची सुनावणी सुरु; आज इतिहासात


वर्षातील प्रत्येक दिवसाप्रमाणेच इतिहासातील अनेक चांगल्या-वाईट घटनांचीही नोंद 2 मे या दिवशी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म 2 मे रोजी झाला. तर महान चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी या दिवशीच या जगाचा निरोप घेतला. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरु झाली. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी. वाचा सविस्तर