Afzal Ansari Disqualified from Lok Sabha: माफिया मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) मोठे बंधू अफजल अन्सारी (Afzal Ansari)  यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं सोमवारी (1 मे) यासंदर्भात अधिसूचना जारी केली. अफजल अन्सारी हे सहा वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. दरम्यान, अफजल यांना गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयानं गँगस्टर अॅक्ट प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 


लोकप्रतिनिधी कायद्यात असं नमूद केलं आहे की, फौजदारी खटल्यात, दोन वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला 'अशा शिक्षेच्या तारखेपासून' अपात्र ठरवलं जाईल आणि तुरुंगात राहिल्यानंतर सहा वर्ष अपात्रता चालू राहील. 


मुख्तार अन्सारीलाही शिक्षा 


माफिया मुख्तार अन्सारीलाही गँगस्टर अॅक्ट अंतर्गत 14 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर 2007 रोजी अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांचा गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली येथील गँगस्टर चार्टमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


बसपाच्या तिकिटावर खासदार झाले अफजल अन्सारी


23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले आणि फिर्यादीचे पुरावे पूर्ण झाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी शनिवारी न्यायालयानं माफिया मुख्तार अन्सारी आणि त्याचे बंधू अफजल अन्सारी यांना शिक्षा सुनावली. अफजल अन्सारी गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर विजयी होऊन लोकसभेत पोहोचले होते. त्याचवेळी मुख्तार अन्सारी हा शेजारच्या मऊ जिल्ह्यातील मऊ सदर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिले आहेत.


मुख्तार अन्सारी यांनी 2022 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली नाही आणि त्याचा मुलगा अब्बास अन्सारी, जो सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा) कडून नशीब आजमावत होता. तो मख्तार अन्सारीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आला. मुख्तार अन्सारी सध्या गुन्हेगारी प्रकरणात बांदा येथील तुरुंगात आहे. शनिवारी मुख्तारला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं. अफझल अन्सारी न्यायालयात हजर झाला असला तरी शिक्षा सुनावल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. 


अफजल अन्सारी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द, काँग्रेस म्हणतेय, एका दिवसांत अधिसूचना जारी?


बहुजन समाज पक्षाचे (बसपा) खासदार अफजल अन्सारी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. गँगस्टर प्रकरणातील 4 वर्षांच्या शिक्षेनंतर बसपा खासदारांचं सदस्यत्व अवघ्या 56 तासांत गेलं आहे. बसपा खासदार अफजल अन्सारी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याबद्दल काँग्रेस आणि भाजपनंही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अंशुल अवस्थी म्हणाले की, विरोधक आणि त्यांच्या नेत्यांना संपवण्याचा हा डाव आहे. शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या एका दिवसांत अधिसूचना जारी करण्याची एवढी घाई का?