Wether Updates: बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा (Cyclone Mocha) असू शकेल. हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता. 


बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे. 


हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, मध्यरात्रीनंतर 11 मे ते 13 मे दरम्यान चक्रीवादळ म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांगलादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीला 150 ते 180 किमी/ताशी वाऱ्याचा संभाव्य वेग आहे, पण तो भारताच्या ओदिशा राज्याच्या किनारपट्टीलाही धडकू शकतं. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा उगम झाल्यास त्याला 'मोचा' असं नाव देण्यात येईल. हे नाव यमननं दिलं आहे.


वादळे का निर्माण होतात?


जेव्हा उबदार, ओलसर हवा थंड हवेमध्ये वाढते तेव्हा गडगडाटी वादळे तयार होतात. उबदार हवा थंड होते, ज्यामुळे ओलावा होतो, ज्याला पाण्याची वाफ म्हणतात, लहान पाण्याचे थेंब तयार होतात. ही एक प्रक्रिया आहे, ज्याला संक्षेपण म्हणतात. 


चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात? 


पूर्वी चक्रीवादळांना नावं दिली जात नव्हती. वादळांच्या तारखांवरुनच ती लक्षात ठेवली जात होती, पण यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. त्यातच समुद्रात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक भागांत चक्रिवादळसदृश परिस्थिती उदभवण्याची शक्यताही नाकारली गेली नाही. अशा परिस्थितीत तारखांचं गणित काहीसं कठिणच होत गेलं. ज्यानंतर जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी चक्रीवादळांना नावं देण्याचं ठरवल्याची माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी एबीपी माझाला दिली.  


चक्रीवादळाच्या नावांवरुन बरेच विचार झाले, ज्यानंतर बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावं देण्यात आली. पण, वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला आणि मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावानं संबोधण्यास सुरुवात झाली. चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इथं देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात. या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळं कमी आल्यास 3 वर्षे ही नावं पुरेशी असतील. चक्रिवादळांची नावं निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व पाळली जाणं महत्त्वाचं असतं. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही. लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱी नावंही टाळली जातात. याशिवाय राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही वादळांना देण्यात येत नाहीत.