(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Modi Govt 9th Anniversary: मोदी सरकारची 9 वर्ष; भाजपकडून मेगाप्लानिंग, जय्यत तयारी सुरू
Modi Govt Ninth Anniversary Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त भाजपनं महिनाभराची योजना आखली आहे.
Modi Govt Ninth Anniversary Celebrations: येत्या काही दिवसांतच मोदी सरकार (Modi Government) आपल्या कारकीर्दीची 9 वर्ष पूर्ण करणार आहे. यानिमित्त भाजपकडून (BJP) देशभरात जंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपनं मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या आयोजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची रॅली, भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या 51 जाहीर सभा आणि नामवंत व्यक्तींशी संपर्क, तसेच एक लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन भाजपकडून केलं जात आहे.
भाजपकडून ही मोहीम 30 मेपासून सुरू होणार असून ती 30 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मोदींनी 30 मे 2019 रोजी पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी मोदी 30 मे किंवा 31 मे रोजी रॅलीला संबोधित करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 29 मे रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील विविध कामगिरीवर प्रकाश टाकणार आहेत.
2024च्या लोकसभा निवडणुकीची भाजपकडून जंगी तयारी
आपल्या सत्तेची 9 वर्ष पूर्ण करताना भाजप सेलिब्रेशनसोबतच 2024च्या निवडणुकांची रुपरेषा आखणार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय मंत्री माध्यमांशी संवाद साधतील. प्रत्येक लोकसभा जागेवर 250 'प्रतिष्ठित' कुटुंबांशी संपर्क साधण्याचीही पक्षाची योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर कार्यक्रमांमध्ये विचारवंत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि व्यावसायिकांसह समाजातील विविध घटकांशी बैठका घेणं यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. भाजप पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे, कारण त्यांना पीएम मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे.
पुढील लोकसभा निवडणूक मे 2024 मध्ये होणं अपेक्षित आहे. त्यापूर्वी यावर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकातील पराभवानंतर या वर्षी होणाऱ्या उर्वरित निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचाही भाजपचा प्रयत्न असेल.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपनं 66, जेडीएसनं 19 जागा जिंकल्या आहेत. 13 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. अजुनही मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे. अशातच कर्नाटकसोबतच भाजप दक्षिणेकडील राज्यांतून हद्दपार झाली. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे आपल्या सरकारची 9 वर्ष साजरी करताना भाजप 2024 लोकसभा निवडणुका समोर ठेवूनच रुपरेषा आखणार आहे, अशी माहिती मिळत आहे.