खरीपातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवला, मोदी सरकारचा निर्णय
सरकारने धान्य पिकांच्या हमीभावात सर्वाधिक 200 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. याआधी शेतकऱ्यांना धान पिकांसाठी 1550 रुपये हमीभाव मिळत होता, आता तो 1750 रुपये मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. गेल्या 10 वर्षात प्रथमच पिकांच्या हमीभावात एवढी वाढ झाली आहे. हमीभाव वाढल्यामुळे महागाई वाढेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र सरकारने हा अंदाज खोडून काढत महागाई वाढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 12 हजार कोटींचा भार पडणार आहे.
पिकांचं उत्पादन अधिक झाल्यास त्याचे भाव घसरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसू नये यासाठी सरकारकडून पिकांचा हमीभाव ठरवला जातो. खरीप हंगामात पिकांचा हमीभाव सरकारकडून घोषित केला जातो. खरीप हंगामासाठी जून महिन्यामध्ये हमीभावाची घोषणा होते. त्यानुसार शेतकरी पिकांचं उत्पादन घेतात. यामध्ये धान्यांव्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन, कापूर, भुईमूग या पिकांचा समावेश असतो.
तज्ज्ञ आणि विरोधक काय म्हणतात? 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनमोहन सिंह सरकारने एमएसपीमध्ये यापेक्षा मोठी वाढ केली होती, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. तर ही वाढ म्हणजे फसवं चित्र असल्याचं विरोधक म्हणत आहेत. सरकारने कितीही हमीभाव जाहीर केला तरी शेतकऱ्याला कमी भावातच व्यापाऱ्याला शेतमाल विकावा लागतो हेच वास्तव आहे.






















