(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मिर्झापूर-2' वर बंदी आणण्याची मिर्झापूरच्या खासदाराची मागणी, कारण...
मिर्झापूरची प्रतिमा खराब करण्यासाठी जे कुणी जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही अनुप्रिया पटेल केली आहे.
मुंबई : अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली मिर्झापूर 2 वेबसीरिज सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. कालीन भैय्या, गुड्डू पंडित यांच्यासह सर्वच कलाकारांच्या अॅक्टिंगची वाह वा होत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील अपना दल खासदार अनुप्रिया पटेल यांनी 'मिर्झापूर 2' या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ही वेब सीरिज जातीय द्वेष पसरवत आहे, असा आरोप अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.यामध्ये मिर्झापूरची 'हिंसक' प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मिर्झापूर हे 'समरसतेचे केंद्र' बनले आहे, असं अनुप्रिया पटले यांनी सांगितलं. मिर्झापूरची प्रतिमा खराब करण्यासाठी जे कुणी जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्यांनी शनिवारी याबाबत एक ट्वीट केले असून त्यात असे म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापूर आता एक शांती आणि सौदार्हाचे प्रतिक बनले आहे. मिर्झापूरच्या या प्रतिमेला वेब सीरीजच्या माध्यमातून तडा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे मिर्झापूरची प्रतिमा ही एक 'हिंसक' आणि 'गुन्हेगारी' अशा स्वरूपाची तयार होत आहे. मिर्झापूर जिल्ह्याची खासदार या नात्याने माझी मागणी आहे की याचा तपास झाला पाहिजे आणि मिर्झापूरची ही अशी प्रतिमा तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे." त्यांनी या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले आहे.
Mirzapur 2 Review | कालिन भय्या, गुड्डू पंडितचा जलवा; मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची हवा
'मिर्झापूर 2' मध्ये दोन कुटुंबं, राजकारण आणि निवडणुका यांच्यातील संघर्षाची हिंसक कहाणी आहे. यात श्वेता त्रिपाठी शर्मा, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमधील सर्व पात्रे खास आहेत. मिर्झापूरच्या यशानतंर पुढच्या भागाची प्रेक्षक आतुररतेने वाट पाहत होते. रिलीज डेटच्या एक दिवस आधी निर्मात्यांनी ही सीरिज रिलीज करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, माफिया राज, सरकारी यंत्रणेचे अपयश आणि गँग वॉर या सर्व गोष्टी या सीझनमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या सीझनपेक्षा अधिक हिंसा आणि अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात आल्याचं दिसून येतं.